अबु धाबी ग्रां प्रि जिंकून मिळविले पहिले जेतेपद, हॅमिल्टनला दुसरे, सेन्झला तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ अबु धाबी
येथे झालेल्या या वर्षातील शेवटच्या अबु धाबी ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने जेतेपद पटकावत या वर्षातील ड्रायव्हर्स वर्ल्ड चॅम्पियशिनशिपही पटकावली. त्याचे हे पहिलेच वर्ल्ड चॅम्पियनशिप जेतेपद आहे. येथील शर्यतीत त्याचा प्रतिस्पर्धी मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनला दुसरे तर फेरारीच्या कार्लोस सेन्झ ज्युनियरला तिसरे स्थान मिळाले.
मागील आठवडय़ात बहरीनमध्ये झालेल्या शर्यतीनंतर हॅमिल्टन व व्हर्स्टापेन यांचे समान गुण झाले होते. त्यामुळे येथील शर्यतीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. ही शर्यत जिंकणारा या वर्षीचा वर्ल्ड चॅम्पियन होणार होता. अतिशय चुरशीच्या झालेल्या या शर्यतीत व्हर्स्टापेनने शेवटच्या 58 व्या लॅपमध्ये हॅमिल्टनला मागे टाकत पहिल्यांदाच चॅम्पियनशिप जिंकली. अल्फा टॉरीच्या युकी त्सुनोदोने चौथे, त्याचाच सहकारी पीयर गॅसलीने पाचवे, मर्सिडीजच्या व्हाल्टेरी बोटासने सहावे, मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने सातवे, अल्पाईनच्या फर्नांडो अलोन्सोने आठवे, त्याचाच संघसहकारी एस्टेबन ओकॉनने नववे व फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने दहावे स्थान मिळवित एक गुण मिळविला.
यावर्षी झालेल्या शर्यतीत हॅमिल्टनने आठ तर व्हर्स्टापेनने दहा शर्यती जिंकल्या. याशिवाय रेड बुलचा सर्जिओ पेरेझ, अल्पाईनचा ओकॉन, मर्सिडीजचा व्हाल्टेरी बोटास यांनी एकेक शर्यती जिंकल्या.