स्टॉकहोम / वृत्तसंस्था
एकमेकांची दर्पण प्रतिमा (मिरर इमेजिस) असणाऱया रेणूंची निर्मिती करण्याची प्रक्रिया शोधून काढण्याच्या महत्वपूर्ण संशोधनासाठी यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक दोन संशोधकांना देण्यात येणार आहे. जर्मनीत जन्मलेले बेंजामिन लिस्ट आणि ब्रिटिश नागरिक असणारे डेव्हिड मॅकमिलन हे पुरस्काराचे मानकरी ठरले.
दर्पण प्रतिमा (मिरर इमेजिस) असणारे हे रेणू औषधनिर्मितीपासून सौरघटांपर्यंत अनेक स्थानी उपयोगी पडणारे आहेत. विविध रोगांवर प्रभावी औषधे त्यांच्यामुळे निर्माण करता येतात. तर सौरघटांमध्ये (सोलार सेल्स) हे रेणू (मॉलेक्यूल्स) प्रकाश पकडून ठेवण्याचे काम करतात. या संशोधकांनी निर्माण केलेल्या टुलकिटमुळे अशा बहुउपयोगी प्रतिमा रेणूंची निर्मिती शक्य झाली आहे.
त्यांनी शोधलेले हे तंत्र ‘ऍसिमेट्रिक ऑरगॅनोकॅटेलिसिस’ या तांत्रिक संज्ञेने ओळखले जाते. या तंत्रामुळे एकमेकांच्या दर्पण प्रतिमा असणारे रेणू तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे. सध्याही हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तथापि ते जटील आणि महाग असल्याने औषधनिर्मिती किंवा ऊर्जासाधनांची निर्मिती जास्त जटील व खर्चिक असते. मात्र, या नव्या तंत्रज्ञानामुळे ही समस्या पुष्कळ प्रमाणात सुटणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
उपयोग कसा होतो
औषध निर्मितीत या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने होईल, असा विश्वास अनेक तज्ञांनी व्यक्त केला. एकमेकांची दर्पण प्रतिमा असणाऱया दोन रेणूंमधील फरक आपले शरीर ओळखू शकेल. या रेणूंच्या दर्पण प्रतिमांपैकी एक प्रतिमा विशिष्ट वासाची आणि दुसरी त्यापेक्षा भिन्न वासाची बनविता येऊ शकेल. त्यावरुन शरीराच्या मज्जासंस्थेला योग्य तो संदेश मिळेल आणि कशाचा उपयोग करायचा याचा निर्णय मज्जासंस्था घेऊ शकेल, अशी ही प्रक्रिया आहे.
रेणूरचनेत क्रांतिकारक परिवर्तन
या तंत्रज्ञानामुळे रेणूरचना कार्यात क्रांतिकारक परिवर्तन येणार असून ही प्रक्रिया वेगळय़ाच उच्च पातळीवर नेण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता आहे, असे मत अनेक तज्ञांनी या संशोधनावर बोलताना व्यक्त केले. येत्या काही वर्षांमध्ये या संशोधनाचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचतील अशा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आतापर्यंत 187 जणांना…
रसायन शास्त्रातील प्रथम नोबेल पुरस्कार 1901 मध्ये दिला गेला. तेव्हापासून आजवर 187 संशोधकांनी तो पटकाविला आहे. त्यांच्यात 7 महिलांचा समावेश आहे. रसायनशास्त्रातील सर्वाधिक नोबेल पुरस्कार आतापर्यंत अमेरिकेने मिळविलेले असून या देशाच्या संशोधकांची संख्या 72 आहे.