वार्ताहर/ हुक्केरी
पिसाळलेल्या कुत्र्यांनी आठ जणांसह काही जनावरांचाही चावा घेतल्याची घटना हुल्लोळहट्टी (ता. हुक्केरी) येथे उघडकीस आली. पिसाळलेल्या या कुत्र्यांमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आवश्यक लस तालुका इस्पितळात उपलब्ध नसल्याने आरोग्य खात्याच्या कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान सदर रुग्णांना बेळगाव येथील जिल्हा आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे डॉ. दोड्डमनी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हुल्लोळहट्टी येथे गेल्या दोन दिवसात तीन ते चार पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडत विविध ठिकाणी आठ जणांसह जनावरांचा चावा घेतला. रामाप्पा बोरण्णावर, लक्ष्मीबाई शावगिरे, बसवराज सावगिरे, पार्वती तळवार यांच्यासह चार मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला. यानंतर जखमींना तत्काळ हुक्केरीतील तालुका इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. पण येथे या उपचारांवर कोणतीच लस उपलब्ध नसल्याने जखमींना बेळगाव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तालुक्यातील अनेक शासकीय रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याने आरोग्य विभाग झोपले आहे का?, असा संतापजनक सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच हुल्लोळहट्टी गावकऱयांनी पाठलाग करून पिसाळलेल्या एका कुत्र्याला ठार केले. मात्र अद्याप अन्य दोन ते तीन पिसाळलेली कुत्री सापडलेली नाहीत. कुत्र्यांच्या या उच्छादामुळे ग्रामस्थांतून भीती व्यक्त होत असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात ग्रा. पं. ला अपयश आल्याचा आरोप होत आहे.
आपल्याकडे लस उपलब्ध नाही…
तालुका रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याबाबत हुक्केरी तालुका वैद्याधिकारी डॉ. उदय कुडची यांना याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर हुक्केरी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संजय दोड्डमनी यांच्याशी संपर्क साधून विचारले असता आपल्याकडे रेबीज लस उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगतिले. तसेच रुग्णांना बेळगाव जिल्हा आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.