केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर फार्मा कंपन्यांकडून दरकपात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाटय़ाने वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी प्रभावी ठरणाऱया ‘रेमडेसिविर’च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. केंद सरकारच्या हस्तक्षेपानंतर फार्मा कंपन्यांनी एमआरपीमध्ये मोठी कपात केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. आता वेगवेगळय़ा कंपन्यांच्या ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनच्या किमती देशभर 899 रुपये ते 3,490 रुपये याच दरम्यान राहणार आहेत. औषधांची यादी आणि किंमतीचा तक्ता ‘एनपीपीए’कडून (नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऍथॉरिटी) जारी करण्यात आला आहे.
‘रेमडेसिविर’ची निर्मिती करणाऱया सातही कंपन्यांनी किंमती कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनच्या काळा बाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘रेमडेसिविर’ची कमतरता देखील मोठय़ा प्रमाणात भासत होती. अशात कोरोना रुग्णांना दिलासा देणारा एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता ‘रेमडेसिविर’चे उत्पादनही वाढणार असून दरही कमी होणार आहेत.
नव्या किंमतीनुसार इंजेक्शनचे दर 2 हजार रुपयांपर्यंत कमी होतील. देशातील 7 विविध कंपन्यांमध्ये ‘रेमडेसिविर’चे उत्पादन होत आहे. कॅडिला हेल्थकेअर, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि सिप्ला या औषध कंपन्यांनी आपापल्या ब्रँडच्या ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन (100 मिलीग्राम / कुपी) च्या किंमती कमी केल्या आहेत. केंद्रीय रसायन व खत मंत्री सदानंद गौडा यांनी औषध कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सरकारने कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे औषध रेमडॅकची किंमत 2,800 रुपयांवरून घटवून 899 केली आहे. याशिवाय सिंजेन इंटरनेशनल लिमिटेडचे औषध रेमविनला 3,950 वरून घटवून 2,450 रुपये तर सिप्लाचे सिप्रेमीची किंमत 4,000 वरून कमी करून 3,000 रुपये केली आहे. मायलॅन फार्मासुटिकल्स लिमिटेडचे डेसरेमची किंमत 4,800 रुपयांवरून घटवून 3,400 करण्यात आली आहे. रेडिक्सची किंमतही 5,400 रुपयांवरून निम्म्यावर म्हणजे 2,700 रुपयांवर आणण्यात आली आहे.
केंद्र सरकारने जुबी-आरच्या किमतीतही 1,300 रुपये कपातीची घोषणा केली आहे. हे औषध आधी 4,700 रुपयांत मिळत होते. ते आता 3,400 रुपयांत मिळू शकणार आहे. सरकारने याशिवाय कोविफोरच्या किमतीतही कपात केली आहे. हे औषध आता 5,400 रुपयांऐवजी केवळ 3,490 रुपयांत उपलब्ध होईल.
कोरोना व्हायरसचे संक्रमन वाढत असल्यामुळे इंजेक्शनसाठी मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे सरकारने इंजेक्शनचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून सामान्य नागरिकांपर्यंत इंजेक्शन पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केंद्र सरकारने इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत. या किंमती कमी करण्यासाठी, रासायनिक खते मंत्रालय उत्पादक कंपन्यांशी मागील 2 दिवसांपासून बैठक करीत होते. अखेर इंजेक्शनच्या किंमती कमी करून उत्पादन वाढवण्यात येणार आहे.