अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिस्ट्रेशनकडून वापरास मंजुरी : डब्ल्यूएचओकडून मात्र सतर्कतेचा सल्ला
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने (एफडीएफ) मागील आठवडय़ात कोरोनावरील उपचारासाठी पहिले औषध म्हणून रेमडेसिविरला मंजुरी दिली आहे. हे औषध शरीरात विषाणूंची संख्या वाढण्यापासून रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहे. महामारीच्या प्रारंभापासूनच या औषधाच्या प्रभावीपणावर चर्चा सुरू आहे. एफडीएच्या मंजुरीनंतरही जागतिक आरोग्य संघटनेने जीव वाचविण्यात रेमडेसिविर उपयुक्त ठरेलच असे नाही असा पुनरुच्चार केला आहे.
एफडीएची भूमिका
एफडीएफने अँटीवायरल औषध रेमडेसिविरला रुग्णालयांमध्ये दाखल प्रौढ तसेच 40 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या मुलांच्या उपचारासाठी मंजूर केले आहे. एफडीएकडून मे महिन्यात रेमडेसिविरचा आपत्कालीन वापर करण्याची मुभा देण्यात आली होती. म्हणजेच गंभीर रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येऊ लागला होता. ऑगस्टमध्ये याची कक्षा वाढवून सौम्य लक्षणे असलेल्यांनाही ते दिले जाऊ लागले.
कोरोनावरील उपचारपद्धतींचे अध्ययन
एफडीए सध्या 5 वेगवेगळय़ा उपचारपद्धतींचे अध्ययन करत आहे. यात रेमडेसिविर सारखी अँटीवायरल औषधे सामील असून ती शरीरातील विषाणूंची संख्या वाढविण्यापासून रोखतात. अशा प्रकारची औषधे एचआयव्ही, हर्प्स आणि हेपेटायटिस सी समवेत अन्य रोगांमध्ये वापरली जातात. अन्य उपचारपद्धतींमध्ये इम्युनोमॉड्य़ूलर्स (इम्युन रिस्पॉन्स नियंत्रित करतात), अँटीबॉडी थेरपी, सेल थेरपी (सेल्युलर इम्युनोथेरपी) आणि जीन थेरपी (जीनच्या एक्स्प्रेशनमध्ये हस्तक्षेप करून उत्पादने तयार करणे) सामील आहे.
डब्ल्यूएचओचा इशारा का?
एफडीएच्या मंजुरीनंतरही जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी पूर्ण जगाच्या औषध नियामकांना या औषधाचा फारच कमी किंवा कुठलाच लाभ नसल्याचे सांगितले आहे. रेमडेसिविरला मंजुरी देण्यात घाई करू नका असेही त्यांनी म्हटले आहे. डब्ल्यूएचओने सर्वात मोठय़ा सॉलिडेरिटी ट्रायल्स करत रेमडेसिविरचा प्रभाव पडताळून पाहिला होता. या औषधामुळे रुग्णाच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही आणि रुग्णालयात दाखल होण्याचे दिवसही कमी झाले नसल्याचे म्हटले गेले.
भारतातील स्थिती
डब्ल्यूएचओने सतर्क केले असले तरीही भारतात रेमडेसिविरचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. एफडीएच्या मंजुरीनंतर भारतात याची किंमत वाढणार असल्याचे मानले जात होते. परंतु सध्यातरी अशी स्थिती नाही. रेमडेसिविरची किंमत 2,900 पासून 5000 रुपये प्रतिडोसपर्यंत राहिली आहे. प्रारंभी याची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत होती. सिप्ला, हिटरो, डॉ. रेड्डीज, जुबिलिएंट, लाइफसायन्सेस आणि जायडस कॅडिलाने मे महिन्यात याच्या जेनेरिक आवृत्तीच्या निर्मितीचा परवाना मिळविला होता. सद्यकाळात भारतीय बाजारांमध्ये हे उपलब्ध आहे. काही राज्यांमध्ये याला कोरोनावरील उपचारपद्धतीत सामील करण्यात आले आहे.
एफडीएफची मंजुरीची पद्धत
नव्या औषधाला मंजुरी देण्यापूर्वी प्रभावीपणा आणि सुरक्षितता या दोन अटी महत्त्वाच्या असतात. कुठल्याही औषधाला मंजुरी देण्यापूर्वी एफडीए बेनेफिट-रिस्क असेसमेंट करते. हे पूर्णपणे वैज्ञानिक मापदंडांवर आधारित आहे. रेमडेसिविरलाही याच प्रक्रियेतून जावे लागले आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजने स्वतःच्या चाचण्यांमध्ये औषध दिलेले रुग्ण 11 दिवसांमध्ये बरे झाल्याचे अनुभवले आहे. सामान्यपणे रुग्ण बरे होण्यास 15-16 दिवस लागत होते.