भाजप आमदार-खासदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :
रेमडेसिवीर इंजक्शन व लसींचे वितरणामध्ये सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सीजनचा पुरवठा रुग्णांच्या प्रमाणात करण्यात यावा व कोवीड लस, ऍन्टीजन टेस्ट किटचा पुरवठा हा लोकसंख्येच्या प्रमाणात तात्काळ करण्यात यावा, यासाठी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशममुख आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते.
या मागण्यांचा विचार न झाल्यास न्यायालयात धाव घेण्यात येईल, असेही उपोषणस्थळी काही आमदारांनी सांगितले. या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून रेमडेसिवीर इंजक्शन, ऑक्सिजन व कोव्हीड लसचा पुरवठा होत आहे. सदर पुरवठा करताना पुणे विभागामध्ये सोलापूर जिह्यावर वितरणाबाबत अन्याय होत आहे. सोलापूर जिह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजक्शन दिली जात नाहीत, तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत केला जात नाही. कोव्हीड लस ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही. ऍन्टीजन टेस्ट किटचा पुरवठा जिह्याला कमी प्रमाणात केला जात आहे. याउलट ज्या जिल्ह्याचे मंत्री आहेत. त्या जिह्यास जादा झुकते माप देऊन सोलापूर जिह्याचाही कोटा विभागातील इतर जिह्यांना जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यू दरामध्ये झालेला आहे. यापूर्वी वेळोवेळी आम्ही प्रशासनामधील संबंधीत अधिकाऱ्यांना पाठपुरावा करुनही वरील बाबींबाबत कोणतीही पूर्तता केली जात नाही.