बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. बऱ्याच राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करणे अवघड होत आहे. दरम्यान कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन नसल्याच्या आणि काळ्याबाजाराच्या तक्रारींदरम्यान इंजेक्शनचा साठा करणाऱ्या दुकानधारकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री बसवराज बोमई यांनी शुक्रवारी दिला.
दरम्यान पोलीस अधिकार्यांशी बैठकीनंतर बोम्माई यांनी, राज्यात रेमडेसिवीरची कमतरता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही लोक जाणीवपूर्वक कृत्रिम संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. साठा करणार्यांवर गुन्हे दाखल केले जातील. दरम्यान ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक आहे. मात्र, हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने, अनेक नातेवाईकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कृत्रिम संकट निर्माण करणाऱ्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा न करता ग्राहकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत असे म्हंटले आहे. तसेच हे इंजेक्शन चुकीच्या पद्धतीने राज्याबाहेर पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाईट कर्फ्यू प्रभावी
बोम्माई म्हणाले की रात्रीचा कर्फ्यू पूर्णपणे प्रभावी आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मुखवटे न घातलेल्या ६५,६३४ जणांवर कारवाई करत दंड ठोठावण्यात आला आहे. गृहमंत्री बोम्माई यांनी कोरोना कालावधीत कर्तव्यावर अअसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे म्हंटले आहे.
दुसऱ्या लाटेतही पोलिसांना कोरोना संसर्ग
दरम्यान दुसर्या लाटेत पोलिसांना संसर्ग झाला आहे, तर त्यांच्या कुटुंबातील ४५० जणांनाही संसर्ग झाल्याची माहिती आहे. रुग्ण असलेल्या सर्व पोलीस कर्मचार्यांना योग्य उपचार मिळावे म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालक स्तरावरील अधिकाऱ्यास समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे, ते गृहमंत्र्यांनी सांगितले.