कोविड कृती दलाच्या बैठकीत निर्णय : सरकारकडून शिफारस होणाऱया रुग्णांवरील उपचाराच्या दरात वाढ
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील खासगी इस्पितळांमध्ये सरकारकडून शिफारस होणाऱया कोविड रुग्णांच्या उपचाराचा दर वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिवीर खरेदीसाठी जागतिक पातळीवर निविदा मागविण्याचा निर्णयही कोविड नियंत्रणासंबंधी मंगळवारी बेंगळूरमध्ये पार पडलेल्या कोविड कृती दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य कोविड कृती दलाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी बेंगळुरात बैठक घेतली. यावेळी या बैठकीत देश किंवा जागतिक पातळीवर कोणत्याही कंपनीकडून रेमडेसिवीर औषध खरेदीसाठी निविदा मागविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱयांना दिल्या.
राज्यात कोणत्याही कारणास्तव रेमडेसिवीरची कमतरता भासू नये यासाठी त्वरित 5 लाख डोस आयात करण्यासाठी जागतिक पातळीवर निविदा मागवा. कंपनी कोणतीही असली तरी हरकत नाही, त्याला आपला आक्षेप नाही. रेमडेसिवीरच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या मृत्यू झाला, असा ठपका येऊ नये. त्यासाठी आतापासूनच कृतीशील व्हा, अशी ताकीद डॉ. अश्वथ नारायण यांनी अधिकाऱयांना दिली.
तसेच सरकारकडून खासगी इस्पितळांमध्ये शिफारस होणाऱया कोविड रुग्णांच्या उपचाराचा दरही वाढविण्यात आला आहे. त्यानुसार ऑक्सिजन व्यवस्था असणाऱया बेडचे दर 7 हजार रुपयावरून 8 हजार रु. पर्यंत वाढविले आहेत. तर आयसीयुमधील (व्हेंटिलेटर नसणारे) बेडचे दर 8500 वरुन 9750 रुपये आणि आयसीयुतील व्हेंटिलेटर सुविधा असणाऱया बेडचे दर 10,000 रु. वरून 11,500 रु. पर्यंत वाढविण्यात आले आहेत. हे दर केव्हापासून जारी करावेत, याबाबत सरकार लवकरच आदेश जारी करेल, असे स्पष्टीकरण अश्वथ नारायण यांनी दिले. मात्र, गंभीर लक्षणे नसणाऱया बाधितांच्या उपचाराचा दिवसाचा दर स्थिर (5,200 रुपये) ठेवण्यात आला असून यामध्ये बदल केलेला नाही.
अधिक वसुली केल्यास कोका
कोणत्याही खासगी इस्पितळांनी बेड, औषधे, ऑक्सिजन, रेमडेसिवीरसह सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक वसुली केल्यास कोका कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचा इशारा डॉ. अश्वथ नारायण यांनी दिला. अधिक शुल्क वसुली होत असेल तर 112 या हेल्पलाईनवर फोन केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे खासगी इस्पितळांनी आपल्याजवळ उपलब्ध असणारे आणि सरकारकडून राखीव ठेवण्यात आलेल्या बेडची माहिती सुवर्ण आरोग्य ट्रस्ट पोर्टलवर अपडेट करावी. त्यावर बेडचे लाईव्ह स्टेट्स असावे. अधिकाऱयांनी यावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी ताकीद त्यांनी दिली.
खासगी इस्पितळांची बिले बाकी असतील तर त्वरित भरा. कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱया कोणत्याही व्यक्तीचे वेतन देण्यास विलंब होऊ नये, अशी सूचना त्यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांना दिली.
लस खरेदीसाठी सूचना
18 ते 44 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची प्रक्रिया मंदगतीने सुरू आहे. लसीच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 3.26 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी लागणार असून त्यांना दोन डोस देण्यासाठी 6.52 कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारकडून कोव्हिशिल्डचे 3 लाख डोस आले आहेत.मे च्या दुसऱया आठवडय़ात आणखी 15 लाख डोस येणार आहेत. जलदगतीने लसीकरण व्हावे यासाठी लसीकरण अभियानाची कार्यसूची बदलावी, कोणाला लस द्यावी याबाबत नवी मार्गसूची बनविण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. अश्वथ नारायण यांनी सांगितले.