प्रतिनिधी / वास्को
वास्को शांतीनगर येथील रेलमार्गावर रेलगाडीने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला. मयत पादचारी मजूर असून त्याचे नाव महम्मद उजाले(34) असे आहे. मयत मजूर झुआरीनगर भागातील राहणारा आहे.
अधिक माहितीनुसार मयत मजूर बुधवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास रेलमार्गे दाबोळीच्या दिशेने चालत जात होता. शांतीनगर येथे पोहोचला असता वास्को स्थानकाच्या दिशेने रेलगाडी आल्याने तो बाजुला उभा राहिला. मात्र, काळोख पडल्याने त्याला रेलगाडीचा धक्का बसेल याचा अंदाज आला नाही. रेलगाडीची धडक बसून दूरवर फेकला गेला व जागीच ठार झाला. वास्कोतील रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. शवचिकित्सेनंतर मृतदेह गुरूवारी दुपारी कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला. या प्रकरणी वास्को रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.