प्रतिनिधी / कणकवली:
कोकण रेल्वेमार्गावर शनिवारपासून दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस सुरू झाली आहे. त्यातून प्रवास करणाऱया प्रवाशांची आरोग्यविषयक तपासणी केली जात आहे. त्यांच्याजवळील कागदपत्रांचीही तपासणी केली जात असून त्यासाठी कोकण रेल्वेकडून स्थानकांवर स्वतंत्र यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तपासणीनंतरच त्यांना एक्सप्रेसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊननंतर रेल्वे वाहतूक बंद होती. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाडय़ा म्हणून मंगला व नेत्रावती एक्सप्रेस या गाडय़ा धावत होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील चाकरमानी व स्थानिक नागरिकांसाठी सोईची असलेली दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत कोकण रेल्वेने शनिवारपासून तुतारी एक्सप्रेस सुरू केली.
तुतारी एक्सप्रेस सुरू करताना रेल्वे प्रवाशांसाठी कोविड 19 विषयक नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली. स्थानकात येणाऱया प्रत्येक प्रवाशाची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतर त्यांच्याजवळील कागदपत्रांचीही छाननी करण्यात येत होती. तपासणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच प्रवाशांना बोगीत प्रवेश दिला जात होता.