बोगी जोडल्या उलटय़ा क्रमाने : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमधील प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
म्हैसूरवरून अजमेरच्या दिशेने जाणारी साप्ताहिक रेल्वे बुधवारी सकाळी रेल्वेस्थानकावर आली खरी, परंतु बोगी चुकीच्या क्रमांकाने लावण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ झाली. प्लॅटफॉर्मच्या एका बाजूला असणाऱया प्रवाशांना दुसऱया बाजूला धावत जाऊन रेल्वेमध्ये प्रवेश करावा लागला. वयोवृद्ध व लहान मुलांचे यामध्ये पुरते हाल झाले. या घडलेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
16210 (म्हैसूर-अजमेर) ही साप्ताहिक रेल्वे बुधवारी सकाळी 9.35 वा. बेळगाव रेल्वेस्थानकात दाखल होते. परंतु बुधवारी ही रेल्वे पाऊण तास उशिराने स्थानकात दाखल झाली. रेल्वेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्या-त्या बोगीसमोर प्रवासी थांबले होते. स्लीपर, एसी बुकिंगप्रमाणे प्रवासी स्थानकात थांबले होते. रेल्वे आली परंतु आरक्षित केलेली बोगी त्यांना सापडत नव्हती. प्रत्येक प्रवाशाला ही समस्या जाणवत असल्यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. ही चूक रेल्वे कर्मचाऱयांच्याही लक्षात आली. त्यामुळे प्रवाशांना मदत करण्यासाठी तेही पुढे सरसावले.
इंजीनजवळ येणारी बोगी शेवटी गेल्याने प्रवाशांना धावपळ करावी लागली. हातातील ओझे घेऊन बोगीमध्ये चढताना प्रवाशांच्या नाकीनऊ आले. वयोवृद्ध प्रवाशांना तर हा प्रवासच नकोसा झाला. यामुळे काही प्रवाशांनी स्थानकावरच आपली नाराजी व्यक्त केली. रेल्वे जास्त काळ थांबत नसल्याने मिळेल त्या बोगीमध्ये चढून त्यानंतर आपली आरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केला. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.