दुपदरीकरणामुळे मिरजहून येणाऱया रेल्वे धावताहेत उशिरा : प्रवाशांचा मात्र खोळंबा, पत्रकाद्वारे रेल्वेकडून दिलगिरी व्यक्त
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे ते हुबळी या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. मिरजहून येणाऱया एक्स्प्रेस बेळगावमध्ये उशिरा पोहोचत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही एक्स्प्रेस दोन ते तीन तास उशिरा दाखल झाल्याने टेनची वाट पहात बसलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली.
रेल्वेची गती वाढून प्रवासाचा वेळ कमी व्हावा, या उद्देशाने रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. मिरज ते लोंढा दरम्यानचे 30 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. केवळ दुपदरीकरणच नाही तर विद्युतीकरणदेखील केले जात आहे. यामुळे येत्या काळात विजेवर चालणारी टेन धावणार आहे.
मिरजहून बेळगावच्या दिशेने येणाऱया अधिकतर एक्स्प्रेस उशिरा येत आहेत. ट्रकचे महत्त्वाचे काम असल्यास एक्स्पेस काहीकाळ नजीकच्या रेल्वेस्थानकावर थांबविली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची तासन्तास वाट पहावी लागत आहे. बेळगाव रेल्वेस्थानकावर काही ठिकाणी रेल्वे विभागातर्फे पत्रके लावण्यात आली आहेत. बेळगाव स्टेशनमधील यार्ड तसेच इतर कामे केली जात असल्याने टेन उशिरा दाखल होत आहेत. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वेने दिलगिरी व्यक्त करणारे पत्रक लावले आहे.
नोकरदारांचे होताहेत हाल
दररोज शेकडो नोकरदार लोंढा, खानापूर, कुडची, रायबाग, गोकाक, घटप्रभा येथून रेल्वेने बेळगाव शहरात येतात. परंतु मागील 15 ते 20 दिवसांत रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अशा नोकरदारांच्या नोकऱया अडचणीत सापडल्या आहेत. कामावर वेळेवर पोहोचता येत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एकतर पॅसेंजर सुरू नाही. त्यातच आता रेल्वे उशिरा धावत असल्याने नोकरी जाण्याची वेळ या प्रवाशांवर आली आहे.