ऑनलाईन टीम / मुंबई :
रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी 10.42 ते दुपारी 3.44 वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱया धिम्या लोकल भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. त्या लोकल दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबतील.
पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. या काळात बोरीवली ते विरारदरम्यान धिम्या लोकल जलद मार्गावर धावतील.
हार्बर मार्गावरून सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱया लोकल सकाळी 10.34 ते दुपारी 3.08 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल यादरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.