दुसरा स्कायवॉक प्रवाशांच्या सोयीसाठी होणार उपलब्ध : लवकरच काम पूर्ण होणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकात मागील काही दिवसांपासून स्कायवॉक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. स्कायवॉकसाठीचे खांब बसविण्यात आले असून उर्वरित काम काही दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर दुसरा स्कायवॉक प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केले जात असून एका विमानतळ टर्मिनलप्रमाणे विकास केला जात आहे. रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीसोबत प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील शेड घालण्यात येत आहे. रेल्वेस्थानकाला यापुढे दक्षिण प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे. तसेच प्लॅटफॉर्मची संख्याही वाढविणार आहे. नागरिकांना यापूर्वी एक स्कायवॉक उभारण्यात आला होता. त्याला लिफ्ट बसविण्यात आल्याने वयोवृद्ध व दिव्यांगांना दुसऱया प्लॅटफॉर्मवर जाणे सोयीचे ठरत होते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अजून एक स्कायवॉक बांधण्यात येत आहे. पंधरादिवसांपासून हे काम सुरू केले होते. पेन लावून स्कायवॉकचे फौंडेशन लावण्यात आले होते. त्यानंतर त्याला इतर साहित्य जोडले जात आहे. या स्कायवॉकमुळे रेल्वेस्थानकाच्या दक्षिण बाजूने उत्तर बाजूला जाणे सोयीचे ठरणार आहे. भविष्यात दक्षिण प्रवेशद्वार सुरू झाल्यानंतर प्रवाशांना हा स्कायवॉक महत्त्वाचा ठरणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसांमध्ये काम पूर्ण केले जाणार आहे.