10 लाखाचे दागिने जप्त, खानापूर, लोंढा येथेही चोरी केल्याची कबुली
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेत प्रवाशांचे दागिने चोरणाऱया हुबळी येथील एका तरुणाला शनिवारी हुबळी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या जवळून सुमारे 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून लोंढा, खानापूरजवळ चोरी केल्याची कबुली या तरुणाने दिली आहे.
रेल्वे विभागाच्या पोलीस प्रमुख डी. आर. सिरीगौरी, पोलीस उपअधिक्षक पुष्पलता यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. सनी सन्मान हवीजा (वय 24, रा. मंटूर रोड, हुबळी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांत रेल्वेत सात ठिकाणी चोऱया केल्याची कबुली त्याने दिली असून त्याच्या जवळून सोन्या, चांदीचे दागिने, वेगवेगळय़ा कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक सत्याप्पा एम., निंगाप्पा हावणगोळ, बसवराज यक्कण्णावर, रमेश लमाणी, सुभाष दळवाई, युसुफ नदाफ, रवी वाल्मिकी, प्रवीण पाटील आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सनी हा अट्टल गुन्हेगार असून मंटूर रोडवरील ओसण्णा चर्चजवळ त्याचे वास्तव्य आहे. 2019 व 2020 मध्ये त्याने बेळगाव, हुबळी धारवाडसह वेगवेगळय़ा ठिकाणी रेल्वेत प्रवाशांचे दागिने, मोबाईल चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.