रेल्वे विभागाकडून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. मुख्य प्रवेशद्वारासोबतच रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेसाठी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. रेल्वे स्थानकाच्या दुसऱया बाजूला पश्चिम दरवाजाचे काम गतिमान असून रेल्वे विभागाकडून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे लवकरच एक सुसज्ज रेल्वेस्थानक बेळगावच्या प्रवाशांना मिळणार आहे.
ब्रिटिशकालीन असणाऱया बेळगावच्या रेल्वे स्थानकाचे 2019 मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वार काढून त्या ठिकाणी अत्याधुनिक असे टर्मिनल उभारले जात आहे. याकरिता तात्पुरत्या स्वरुपात दुसऱया जागेतून प्रवेशद्वार सुरू करण्यात आले होते. मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम ठप्प झाले होते. कामगार आपापल्या गावी परतल्याने जूनपर्यंत अत्यंत धिम्यागतीने काम सुरू होते. जुलैपासून रेल्वे स्थानकाच्या बांधकामाच्या कामाने गती घेतली आहे.
सध्या मुख्य इमारतीचे तीन मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यासोबत इतर ठिकाणचे बांधकामही सुरू आहे. पूर्वीच्या गुड्सशेड येथे आता नव्याने कोच केअर शेड उभारले जात आहे. यासाठी मोठे पिलर्स उभारण्यात आले असून, उर्वरित काम सुरू आहे. यामुळे आलेल्या रेल्वेची स्वच्छता रेल्वे स्थानकावर करणे सोयीचे ठरणार आहे. काही रेल्वे बेळगावमधून निघत असल्याने त्यांची स्वच्छता रेल्वे स्थानकावरच करण्यात येणार आहे.
शहराच्या दक्षिण भागातील प्रवाशांना स्थानकात प्रवेश करता यावा, यासाठी दक्षिण प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे. यासाठी बांधकाम करण्यात येत आहे. ट्रक शेजारीच हे प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच हुबळी विभागीय अधिकारी अरविंद मालखेडे यांनी रेल्वेस्थानक नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करून त्याचा आढावा घेतला होता.