सिंध प्रांतात दुर्घटना, 75 जण जखमी, दोन एक्स्प्रेसची समोरासमोर धडक
कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील दक्षिण सिंध प्रांतामध्ये दोन रेल्वेंची समोरा-समोर टक्कर होऊन अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सर सय्यद एक्स्प्रेस व मिल्लत एक्स्प्रेस या दोन गाडय़ांची टक्कर झाली असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 75 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. या अपघातानंतर 13 ते 14 बोगी रुळावरून घसरल्यानंतर अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकून पडले होते. तसेच सहा ते आठ डब्यांच्या बहुतांश डब्यांचा चेंदामेंदा झाला होता. मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
पाकिस्तानच्या घोटकी येथील रेती आणि दहारकी रेल्वे स्थानकांदरम्यान मिल्लत व सर सय्यद एक्स्प्रेस या दोन गाडय़ांची समोरा-समोर धडक झाल्याने मोठी रेल्वे दुर्घटना घडली. रावळपिंडीहून कराचीच्या दिशेने जाणारी सर सय्यद एक्स्प्रेस गाडी कराचीहून सरगोधाकडे जाणाऱया मिल्लत एक्स्प्रेसला धडक बसून हा अपघात झाला. मदत आणि बचावकार्य सुरू असून, संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक प्रवाशांना रेल्वे बोगी कापूनच बाहेर काढावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा अपघात घोटकीजवळ झाला आहे. स्थानिक जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, मिल्लत एक्स्प्रेसच्या बोगी अनियंत्रित होऊन दुसऱया रेल्वेवर जाऊन आदळल्या. त्याचदरम्यान मिल्लत एक्स्प्रेसच्या 8 बोगी रेल्वे रुळावरून घसरल्या. अपघातात मृत झालेल्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. या अपघातानंतर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मदतकार्यासाठी पाकिस्तानी आर्मी आणि निमलष्करी दलाच्या रेंजर्सना पाचारण करण्यात आले होते. जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे तर रेल्वेच्या डब्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी रेल्वे सुरक्षेतील दोष शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर घोटगी, धारकी, ओबारो आणि मिरपूर माथेलो येथील रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जारी करण्यात आली असून सर्व जखमींवर येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.