गांधीनगरजवळील दुर्घटना, जिवीतहानी टळली
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारची दुपार… घडाळय़ात पावणेतीन वाजलेले, गांधीनगरजवळील रेल्वेरूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेला इसम, मात्र, त्याचवेळी रेल्वे आल्याने त्याची भीतीने गाळण उडाली आणि त्याने मोटारसायकल सोडून आपला जीव वाचविणे योग्य समजले. त्यामुळे त्याची ती मोटारसायकल रेल्वेखाली अडकली.
शेडबाळहून बेळगावकडे येणाऱया पॅसेंजरखाली ही मोटारसायकल अडकली. मोटारसायकल रेल्वेखाली गेलेली पाहून स्वाराने तेथून पलायन केले. मात्र, रेल्वेखाली सापडून बाहेर फेकली गेल्यामुळे त्या मोटारसायकलचे रूपांतर भंगारात झाले आहे. ती मोटारसायकल कोणाची आणि ती चालवत कोण होते? याचा उलगडा झालेला नाही.
घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेचालकाने रेल्वे थांबवली. रेल्वेसुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. आरपीएफचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संगमेश कलबुर्गी, एम. जी. नायक, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ती मोटारसायकल ताब्यात घेतली असून तिच्या समोरील आणि पाठीमागील नंबरप्लेटची वाट लागली आहे.
मोटारसायकलच्या इंजीन व चेस्सी नंबरवरून मालकाचा शोध घेण्यात येत आहे. रेल्वेसुरक्षा दलाने या घटनेची नोंद केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार केवळ व्यक्तीच नव्हे तर त्याच्यासोबत आणखी एक महिला व मुलेही होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हे सर्वजण सुखरुप बचावले आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते कोण? याचा उलगडा झालेला नाही.