बिहारमध्ये अजब घोटाळा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या समस्तीपूर लोको डिझेल शेडच्या एका इंजिनियरने विभागीय मॅकेनिकल इंजिनियरचे बनावट आदेशपत्र दाखवून पूर्णिया कोर्ट स्थानकानजीक कित्येक वर्षांपासून उभे असलेले जुने वाफेचे इंजिन (स्टीम इंजिन) भंगार माफियाला विकले आहे. हा प्रकार उघड होऊ नये म्हणून एका निरीक्षकाशी संगनमत करत रजिस्टरवर एका पिकअप व्हॅनच्या प्रवेशाची नोंद करण्यात आली होती. पण ऑन डय़ुटी कॉन्स्टेबल संगीता कुमारी यांच्या अहवालानुसार चौकशी सुरू झाल्यावर घोटाळय़ाचा खुलासा झाला.
याप्रकरणी रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून इंजिनियर राजीव रंजन झा, त्याचा मदतनीस सुशील यादव यांच्यासह 7 जणांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपी इंजिनियरसह डीझेल शेड पोस्टवर तैनात निरीक्षक वीरेंद्र द्विवेदीला निलंबित करण्यात आले आहे. तर फरार इंजिनियर झा याच्या मुसक्या आवळण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
14 डिसेंबर रोजी समस्तीपूर डिझेल शेडचे इंजिनियर राजीव रंजन झा हे मदतनीस सुशील यादवसोबत मिळून जुन्या स्टीम इंजिनचा खालील भाग गॅस कटरद्वारे वेगळा करत होते. यावेळी एका अधिकाऱयाने त्यांना रोखले असता इंजिनियरने विभागीय मॅकेनिकल इंजिनियरचे पत्र दाखवत इंजिनाचे स्क्रॅप डीझेल शेडमध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगितले होते.