ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱया टोळीचा रेल्वे सुरक्षा बलाने पर्दाफाश केला आहे. या टोळीची सूत्रे दुबई, सिंगापूर आणि पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहेत.
याप्रकरणी गुलाम मुस्तफा याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. 10 दिवसांपर्यंत तो तपास यंत्रणांच्या ताब्यात होता. तपासादरम्यान, ही टोळी गुन्हेगारी पद्धतीने पैसे कमविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत होती. या टोळीसाठी काम करणाऱया वेगवेगळ्या लोकांची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांना ही टोळी पैसे पुरवत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या टोळीमध्ये सव्वा दोनशे लोक सामील आहेत. या टोळीशी संबंधित 28 लोकांना आरपीएफने अटक केली आहे.
तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून ही टोळी काम करत आहे. गुलाम मुस्तफा हा आरोपी सॉफ्टवेअर डेव्हलप करुन टोळीतील लोकांना विकतो. त्याआधारे लोक तिकिट एजंटांपर्यंत पोहचतात. वेगवेगळ्या बँकात जमा झालेल्या पैशाचा क्रिप्टो करंसीद्वारे वापर केला जातो.
सिंगापूर पोलीस या सॉफ्टवेअर कंपनीचा तपास करत आहेत. तसेच या टेरर फंडिंगचा संबंध तहरिक-ए-पाकिस्तानशीसुद्धा असल्याचे तपासात उघड झाले आहे.