प्रतिनिधी/ मडगाव
रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आला होता, तो रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन गोंयात कोळसो नाका व गोंयचो एकवोट या संघटनांनी काल सोमवारी उपजिल्हाधिकाऱयांना सादर केले आहे. रविवारी रात्री चांदर येथे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱयांनी रेल्वे क्रॉसिंग बंदचा आदेश मागे घ्यावा किंवा उद्या मंगळवार दि. 3 नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱयांनी बैठक घ्यावी असे उपजिल्हाधिकाऱयांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दोन्ही संघटनाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे जास्तीत जास्त 25 जणांचे प्रतिनिधीमंडळ जिल्हाधिकाऱयांना भेटू शकतील व त्यांना एकूण परिस्थितीची कल्पना देईल अशा पद्धतीने प्रयत्न करावा असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी जर बैठक किंवा प्रतिनिधी मंडळाला भेटत नसेल तर जनतेकडे आंदोलन सुरू ठेवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. नागोवा आणि मुरगाव ग्रामस्थ, गोंयात कोळसो नाका आणि गोंयचो एकवोटच्या प्रतिनिधींनी निवेदनवार स्वाक्षरी केली आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी गिरदोली जंक्शन ते चांदोर चर्च आणि रावणफोंड ते दवर्ली दरम्यान, दवर्ली गावात सांव जुझे दी आरियल, नेसाय या तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग रस्ते तात्पुरत्या बंद करण्यास रेल्वेला परवानगी दिली होती.
चांदर येथे पहाटे पर्यंत चालले आंदोलन
रविवारी रात्री रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंदोलकांनी हातात मेणबत्त्या घेऊन सरकारचा निषेध केला. अनेकांनी रेल्वे मार्गावरच ठिय्या मारला तो सोमवारी पहाटे पाच वाजे पर्यंत कायम होता.
कोणत्याही परिस्थितीत आत्ता रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होऊ दिले जाणार नसल्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे. रेल्वे विकास निगमने काम चालू ठेवल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.