प्रतिनिधी/ धारबांदोडा
कुळे ते केसरलॉक दरम्यान होऊ घातलेल्या रेल्वे दुपदरी मार्गामुळे दूधसागर धबधब्याच्या सौंदर्यात कुठलीच बाधा येणार नाही व त्याचा येथील पर्यटनावर विपरित परिणाम होणार नाही याचा सखोल विचार करूनच प्रकल्पाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या सर्व साधारण सभेत करण्यात आली. तसा ठराव संमत करण्यात आला.
कुळे येथील श्री राक्षस मळीकेश्वर मंदिरच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष दिलीप मायरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा पार पडली. रेल्वे दुपदरीकरणाला संघटनेचा विरोध नाही. मात्र या प्रकल्पामुळे दूधसागर पर्यटनावर परिणाम होणार नाही याची सरकारने दखल घ्यावी, असा ठराव घेऊन त्यासंबंधी रेल्वे व अन्य संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. दुधसागरवर पर्यटकांची वाहतूक करणाऱया नवीन जीपगाडय़ांची नोंदणी सरकारी राजपत्रकात अद्याप झालेली नाही. त्यासाठी संघटनेने प्रयत्न करावे. यंदाच्या दूधसागर पर्यटन हंगामासंबंधी सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना नवीन मार्गदर्शक तत्वे लागू होई पर्यंत व्यवसाय सुरु होण्याची शक्यता नाही. मात्र त्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे अध्यक्ष मायरेकर यांनी सांगितले. पर्यटन व्यवसाय सुरु झाल्यानंतर प्रत्येक जीप गाडीत सेनिटायझर ठेवणे आवश्यक असून पर्यटकांना सफर घडवून आणल्यानंतर पुन्हा संपूर्ण जीपगाडीची निर्जंतुंकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष नंदीश देसाई, सचिव ब्रिजेश भगत, खजिनदार जानबा लांबोर, सदस्य बेनी आझावेदो, सुकूर मास्कारेन्हास, ट्रिपोलो सोझा, नरेश शिगांवकर, कमलेश म्हार्दोळकर हे उपस्थित होते. अध्यक्ष मायरेकर यांनी स्वागत तर सचिव ब्रिजेश भगत यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. खजिनदार लांबोर यांनी जमाखर्च सादर केला. सागर गांजेकर, नामदेव म्हार्दोळकर, जोन्सन गुदिन्हो, अशोक खांडेपारकर, उमेश नाईक, शशिकांत पाडेलकर, श्री. मान्युएल व अन्य सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. नंदीश देसाई यांनी आभार मानले.