प्रतिनिधी/ बेळगाव
वर्षभरापासून बंद असलेली पॅसेंजर रेल्वे शनिवारपासून पुन्हा एकदा धावू लागली आहे. यामुळे जिल्हय़ातील रेल्वे प्रवाशांची सोय झाली असली तर त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जरी पॅसेंजर रेल्वे सुरू झाली असली तरी त्याला एक्सप्रेसचा तिकिट दर आकारण्यात येत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे दुप्पट तिकिट खर्च करून प्रवाशांना पॅसेंजर रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे.
शनिवारी वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर पहिली पॅसेंजर रेल्वे बेळगाव – शेडबाळ मार्गांवर धावली. पहिलाच दिवस असल्याने तसेच प्रवाशांमध्ये तितकीशी जागृती नसल्याने प्रवाशांची संख्या मर्यांदित होती. बेळगावमधून गोकाक, घटप्रभा, कुडची, शेडबाळ या परिसरात जाणाऱया प्रवाशांनी या पॅसेंजरचा प्रवास केला. वर्षभरानंतर पॅसेंजर सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तिकिट दरवाढीने नाराजी
स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी पॅसेंजर रेल्वेचा प्रवास करतात. यापूर्वी गोकाक ते बेळगाव या दरम्यान धावणाऱया पॅसेंजर रेल्वेचे तिकिट 25 रुपये होते. ते आता 50 रूपये झाले आहे. एक्सप्रेसच्या तिकिट दराइतकाच तिकिट दर पॅसेंजरला ठेवण्यात आला आहे. यामुळे दररोज कामानिमित्त ये- जा करणाऱयांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पूर्वी इतकेच तिकिट दर आकारावे अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
सामान्य तिकिट काऊंटर झाले सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बंद असलेले बेळगाव रेल्वेस्थानक परिसरातील सामान्य तिकिट काऊंटर शनिवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना पॅसेंजरचे तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी हे काऊंटर सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी ग्राहकांना बुकिंग काऊंटरवर जावून तिकिटांचे बुकिंग करावे लागत होते. बेळगाव सोबतच इतर रेल्वे स्थानकांवरील सामान्य तिकिट काऊंटर सुरू करण्यात आली आहेत.