प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, रेल्वे विभाग व आरपीएफ आदी वेगवेगळय़ा विभागांनी समन्वयाने काम करण्यासंबंधी रविवारी येथील रेल्वे पोलीस स्थानकात अधिकाऱयांची बैठक झाली. रेल्वे विभागाचे मंडल पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
रविवारी सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत ही बैठक झाली. आरपीएफचे अधिकारी, रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक, तिकीट तपासनीस, व्यापारी आदींना बैठकीला बोलाविण्यात आले होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच सुधारणांसाठी कोणती उपाययोजना करावी, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची म्हणाले, पोलीस, रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी, आरपीएफचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय असेल तरच उत्तम सेवा देता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने एकमेकांच्या समन्वयाने काम करावे. आपल्या अडचणी मांडण्यासाठी या तिन्ही विभागाचे व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात रहावे. समन्वय असेल तरच सेवेत सुधारणा होणार आहे.