प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे प्रवाशांना गुंगीचे औषध देवून त्यांच्या जवळील मोबाईल संच व रोकड लुटणाऱया बिहारी टोळीतील एका तरुणाला गुरुवारी पोलीस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्याला लोंढय़ाला नेवून रेल्वे पोलिसांनी त्याची बॅग जप्त केली.
महम्मद मुक्तार आलम महम्मद अनरुल हक्क (वय 21, रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. रेल्वेचे मंडल पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. रमेश यांनी गुरुवारी न्यायालयाची परवानगी घेवून त्याला पोलीस कोठडीत घेतले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन रेल्वे पोलिसांनी महम्मद मुक्तारला ताब्यात घेतले. त्यानंतर लोंढय़ाला नेवून त्याने ठेवलेली एक बॅग जप्त करण्यात आली. सायंकाळी पोलीस कोठडीची मुदत संपताच वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
23 मार्च रोजी बेळगाव रेल्वे पोलिसांनी बिहारमधील एका त्रिकुटला अटक केली होती. या त्रिकुटाने 19 मार्च रोजी वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱया प्रवाशांना चॉकलेटमधून गुंगीचे औषध देवून मोबाईल, रोकड व इतर किंमतीच्या वस्तु पळविल्या होत्या. एक दिवसासाठी त्रिकुटापैकी एकाला पोलीस कोठडीत घेवून त्याची चौकशी करण्यात आली आहे.