कोच्युवेली-एलटीटी एक्सप्रेसमधील घटना
प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांमध्ये चोऱयांचे सत्र सुरूच आहे. कोच्युवेली-एलटीटी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱया महिलेच्या पावणेचार लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञाताने आंजणी रेल्वेस्थानकात डल्ला मारला. या बाबत रजनी राजू कोटीयन (68, खार पूर्व) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली. ही घटना 20 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
त्या कोच्युवेली-एलटीटी एक्सप्रेसमधून आरक्षित डब्यातून प्रवास करत होत्या. त्या झोपल्या असल्याची संधी साधत अज्ञाताने सोन्याचा ऐवज असलेल्या पर्ससह पोबारा केला. महिन्यातील ही चौथी घटना आहे. कोकण मार्गावर वाढलेल्या चोऱयांच्या सत्रामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहिले आहे.
रेल्वेतील प्रवाशाचे मोबाईल, रोख रक्कम चोरीस
चिपळूण ः कोचिवली-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस या रेल्वेगाडीतून गोवा ते चिपळूण असा प्रवास करणाऱया एका प्रवाशाचे 2 मोबाईल व रोख रक्कम असा 25 हजार 498 रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ाने चोरला. ही घटना 16 ते 17 जूनदरम्यान घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी नंदलाल शंकर चौहाण (23, उत्तरप्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो 16 जून राजी सायं. 5.40 ते 17 रोजी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास गोवा ते चिपळूण असा कोचिवली-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस या रेल्वेगाडीतून बोगी नं. डी 1, आसन नं. 5 या डब्यातून सीटवर झोपून प्रवास करत होता. यावेळी त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेला 12 हजार 999 रुपये व 11 हजार 999 रुपये किंमतीचे 2 मोबाईल व रोख रक्कम 5 हजार रुपये असा 25 हजार 498 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरटय़ाने चोरला. हा प्रकार नंदलालच्या लक्षात आल्यानंतर त्याने या बाबत चिपळूण पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.