नागपूर-मडगाव रेल्वेत अडीच लाखाची चोरी
चिपळूण
नागपूर-मडगाव फेस्टीवल स्पेशल रेल्वेगाडीने गोव्याकडे जात असताना एका प्रवाशाचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 49 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याचा प्रकार चिपळूण रेल्वेस्थानकादरम्यान उघडकीस आला. ही घटना 6 ते 7 फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद श्रीकांत नंदकिशोर गिंडोदिया (38, धुळे) याने दिली. त्यानुसार गिंडोदिया 6 फेबुवारी रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास नाशिक रेल्वेस्टेशनवरुन गोवा येथे जाण्यासाठी नागपूर-मडगाव फेस्टीवल स्पेशल रेल्वेगाडीने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान 7 रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास ही रेल्वेगाडी चिपळूण रेल्वेस्थानकात आली. यावेळी त्यांना झोपेतून जाग आली. त्यावेळी त्याची पत्नी ज्या आसनावर बसली होती, तेथे ठेवलेली पर्स कुणीतरी चोरुन नसल्याचे निदर्शनास आले. या पर्समध्ये 70 हजार रोख, 1 लाख 73 हजार किंमतीचे दागिने, 6 हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण 2 लाख 49 हजार किंमतीचा मुद्देमाल होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेत्रावती, मंगला एक्सप्रेसमधून चोरी
दरम्यान, मडगाव जंक्शन येथून अप नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे गाडीतून 23 फेब्रुवारी दरम्यान किरण सुनील पुंभार (22, बारामती) यांच्या बॅगेतीले पाकिट चोरटय़ाने चोरुन नेले. तसेच कोमल दिपचंद्र महावर (20, दिल्ली) ही 21 फेब्रुवारी रोजी दिल्ली रेल्वेस्थानकावरुन मंगला निजामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास करीत असताना तिने चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल चोरीला गेला होता. हा प्रकार चिपळूण रेल्वेस्थानकात उघडकीस आला.