स्वच्छता-रेल्वे वेळापत्रकावरून खासदारांनी अधिकाऱयांना धरले धारेवर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. बुधवारी खासदार मंगला अंगडी यांनी रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा घेतला. एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी रेल्वे अधिकाऱयांना दिले. रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण हे कै. सुरेश अंगडी यांचे स्वप्न असल्याने स्थानकाचे काम व्यवस्थित पद्धतीने झाले पाहिजे, असे त्यांनी बजावले.
बुधवारी सकाळी रेल्वे अधिकारी व खासदारांनी रेल्वे स्थानकाला भेट दिली. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. विमानतळ टर्मिनलप्रमाणे सर्वसोयिनियुक्त असे हे रेल्वे स्थानक उभारले जात आहे. रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून, एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱयांना दिले. यावेळी रेल विकास निगमचे सहाय्यक महा व्यवस्थापक (सिव्हिल) अरुणकुमार पाटील, नैर्त्रुत्य रेल्वेचे सहाय्यक मंडल अधिकारी महेश बराळे, स्टेशन मास्तर नागराजू यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता नसल्यास कारवाईचा इशारा
रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेवरून खासदारांनी रेल्वे कर्मचारी व अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. येणाऱया प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी रेल्वेने घ्यावी. स्वच्छतागृह व रेल्वे स्थानकावर स्वच्छता नसल्यास कारवाईचा इशाराही दिला. रेल्वे उशीराने धावत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर रेल्वे अधिकाऱयांनी दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याचे उत्तर दिले.