कोकण रेल्वे प्रवाशांची तपासणी आजपासून होणार कडक
कोकण रेल्वे कडून विशेष सूचना
प्रतिनिधी / बांदा:
वारंवार सूचना करूनही तपासणीकरिता रेल्वे सुटण्याच्या वेळेपूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱया प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे. आजपासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱया प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वे आजपासून रत्नगिरी सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात या बाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे.
कोविडचा धोका पूर्णतः टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासन सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करीत आहे. याकरिता रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाशांनी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे, असे आवाहन गेले काही दिवस कोकण रेल्वे करीत आहे. या आवाहनाला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबविले जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱया प्रवाशांना रेल्वेच्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे.
कोविडचा प्रसार होऊ नये, यासाठी कोकण रेल्वे सर्व त्या खबरदारी घेत आहेत. या सगळय़ाकरिता कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी, सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करीत असाल तर निर्धारित वेळेपूर्वी किमान पाऊणतास आधी रेल्वे स्थानकात पोहोचा. अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची ट्रेन चुकू शकते, अशा इशारा रेल्वे प्रशासनकाडून देण्यात आला आहे.