बेळगाव / प्रतिनिधी
राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे महत्त्वाची आहेत. शहरातील अशोकनगर, गोवावेस, रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर, बिगबाझार आदी ठिकाणी असलेल्या बेळगाव वनच्या कार्यालयांतून आधारकार्ड, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक कार्ड यासह इतर शासकीय कागदपत्रे पुरविली जातात. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या कार्यालयांतून नवीन रेशनकार्ड बनविण्याचे काम ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनता अडचणीत आली असून गोर-गरिबांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. त्याबरोबर शासनाच्या विविध सुविधांपासून लांब राहावे लागत आहे. त्यामुळे ठप्प झालेल्या रेशनकार्डच्या कामाला तातडीने चालना द्यावी, अशी मागणी सर्व सामान्यांतून होत आहे.
शासनाने लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना वाढीव रेशन दिले. मात्र, अनेकांकडे रेशनकार्ड नसल्याने वाढीव रेशनपासून वंचित राहावे लागले होते. बेळगाव वन कार्यालयात सर्वसामान्य जनता नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी येत असली तरी त्यांना अद्याप रेशनकार्डचे काम सुरू नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. शासकीय कामाबरोबर इतर कोणत्याही कामासाठी आधारकार्ड व रेशनकार्ड महत्त्वाचे असून सध्या रेशनकार्डचे काम बंद असल्याने नागरिकांना शासकीय सुविधांपासून दूर राहावे लागत आहे.
नवीन रेशनकार्ड बनविण्याचे काम ठप्प असल्याने सामान्य जनतेला रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे जनता अडचणीत आहे. त्यातच रेशनकार्ड काम ठप्प झाल्याने अनेकांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नवीन रेशनकार्डचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.