कार्डधारकांसाठी ‘मेरा रेशन ऍप’ : मोबाईलवर उपलब्ध होणार माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांसाठी ‘मेरा रेशन’ नावाने मोबाईल ऍप सादर केला आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांना आता घरबसल्या संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. शिवाय या ऍपद्वारे गरीब, गरजू कुटुंबीयांना जवळच्या रेशन दुकानाविषयी व इतर सुविधांची माहिती मिळणार आहे. मात्र, यासाठी लाभार्थ्यांकडे ऍन्ड्रॉईड स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे.
एक देश एक रेशनकार्ड पुढाकाराच्या दिशेने पाऊल टाकत ‘मेरा रेशन’ मोबाईल ऍप सादर करण्यात आला आहे. यामुळे लाभार्थी स्वतःचे घर बदलून दुसऱया ठिकाणी राहायला गेल्यास या
ऍपद्वारे रास्त दराचे धान्य दुकान जवळ कोठे आहे, त्या ठिकाणी कोणत्या सुविधा पुरविल्या जातात, याची संपूर्ण माहिती मिळते. संबंधित लाभार्थी गुगल पे स्टोअरवरून हा ऍप डाऊनलोड करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जनतेसाठी लाभदायक
कोरोना काळात परप्रांतीय देशभर अडकले. दरम्यान, रेशन न मिळाल्याने अनेकांचे हाल झाले. याची दखल घेत केंद्र सरकारने देशातील जनतेसाठी ‘एक देश एक रेशनकार्ड’ योजना राबविली आहे. यामुळे देशातील कोणत्याही जवळच्या रेशन दुकानातून लाभार्थी रेशन मिळवू शकतात. गोरगरीब जनतेसाठी शासन रेशन पुरवठा करते. मात्र, काही कारणामुळे अनेक लाभार्थ्यांपर्यंत रेशन पोहोचत नाही, अशा लाभार्थ्यांना एक देश एक रेशनकार्ड योजना लाभदायक ठरणार आहे.