केंद्र सरकार योजनेवर वर्षाला 2700 कोटी खर्च करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रेशन दुकानांवर फोर्टिफाईड तांदूळ वाटपाच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही योजना 2024 पर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तीन टप्प्यात लागू केली जाणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार वर्षाला 2,700 कोटी रुपये खर्च करणार आहे.
गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी माध्यान्ह भोजनसारख्या विविध योजनांद्वारे गरिबांना पौष्टिक म्हणजेच फोर्टिफाईड स्वरुपाचा तांदूळ वितरित करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधानांनी उचललेल्या पावलांचा संदर्भ देत महिला आणि मुलांमधील कुपोषणाच्या अहवालांदरम्यान सरकार त्यांच्या आदेशांचे पालन करत असल्याचे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. या तांदळाच्या पुरवठा आणि वितरणासाठी एफसीआय आणि राज्य एजन्सींनी 88.65 एलएमटी फोर्टिफाईड तांदूळ खरेदी केला आहे.
फोर्टिफिकेशन म्हणजे काय?
फोर्टिफिकेशन ही एक प्रक्रिया आहे. फोर्टिफाईड तांदळामध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी-12 हे घटक असतात. हा तांदूळ लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून, त्यामुळे लोहाची कमतरता, अशक्तपणा व महत्वपूर्ण सूक्ष्म घटकांची स्थिती सुधारते. तसेच ऍनिमिया, रक्ताशय होऊ नये, यासाठी उपयुक्त आहे. अल्पावधीत पोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी हे प्रभावी धोरण आहे.