सुरक्षित अंतर राखण्यासाठी उपाय
बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे गरीब जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य सरकारच्या वतीने बीपीएल तसेच अंत्योदय कार्डधारकांना दोन महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याची सूचना करण्यात आली आहे. यानुसार शहर आणि परिसरातील रेशन दुकानातून रेशन पुरवठा सुरू झाला आहे. तर रेशन घेण्यासाठी येणाऱया नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे यासाठी दुकानदारांनी ठराविक अंतरावर खुर्च्या ठेवून चांगली व्यवस्था केली आहे. यामुळे कार्डधारकांचीही सोय झाली आहे. सर्वच दुकानदारांनी अशी खबरदारी घेतल्यास सूचनांचेही काटेकोरपणे पालन होण्यास मदत मिळणार आहे.
लॉकडाऊनमुळे रेशन पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होऊनये यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वतीने दोन महिन्याचे रेशन एकदाच देण्यात येत आहे. मात्र रेशन खरेदीसाठी दुकानासमोर गर्दी होऊनये यासंबंधी दुकानदारांना सूचना करण्यात आली आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दुकानदारांची धावपळ उडत आहे. एकीकडे दोन महिन्यांचे रेशन वाटप करण्याचे काम करावे लागत आहे. दुसरीकडे दुकानासमोर कार्डधारकांची गर्दी वाढू नये याच्याकडेही लक्ष द्यावे लागत आहे. काही रेशन दुकानदारांना तसेच कार्डधारकांनाही पोलीसांचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सध्या रेशन पुरवठा सुरू झाला आहे. बेळगाव जिल्हय़ात दोन महिन्याचा रेशन पुरवठा उपलब्ध असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये कार्डधारकांना दोन महिन्याचे रेशन सुरळीतपणे मिळणार असल्याचे अन्न व नागरि पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी कळविले आहे.