‘आयएसओ’ मानाकंनासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरु
कोल्हापूर / प्रवीण देसाई
रेशन व्यवस्थेचे पारंपरिक चित्र बदलण्यासाठी पुणे विभागांतर्गत रेशन दुकाने, पुरवठा कार्यालये, धान्य गोदामे आदींचे ‘आयएसओ’ मानांकनसाठी मुल्यमापन होणार आहे. यासाठी जिह्यातील रेशन दुकाने, धान्य गोदामे, पुरवठा कार्यालये चकाचक व्हायला सुरुवात झाली आहे. हे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी केली जाणार आहे. त्यांच्याकडून रेशन दुकानातील स्वच्छता, रेकॉर्ड अद्ययावत आहे का?, धान्य वाटप आदींची माहिती घेतली जाणार आहे.
रेशन दुकाने म्हणजे अस्वच्छता, रेकॉर्ड व्यवस्थित नाही, लाभार्थींना धान्य मिळत नाही अशी वर्षानुवर्षांची प्रतिमा बदलण्यासाठी पुरवठा विभागाचा प्रयत्न आहेत. याचाच एक भाग म्हणून पुणे विभागातील साडेनऊ हजार रेशन दुकानांचे ‘आयएसओ’ मानांकन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, शहर पुरवठा अधिकारी कार्यालय, धान्य गोदामे, सर्व तालुका पुरवठा कार्यालयांचेही आयएसओ मानांकन केले जाणार आहे.
रेशन दुकाने आणि दुकानदारांची प्रतिमा सुधारायची असेल तर स्वच्छतेपासून लाभार्थ्यांना धान्य पुरवठ्यापर्यंतची यंत्रणा सुधारण्याची गरज आहे. यासाठी पुणे विभागीय पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी ही संकल्पना राबविली आहे. यासाठी त्यांनी पुणे विभागातील प्रत्येक जिह्यात जाऊन जिल्हा पुरवठा विभाग व रेशन दुकानदारांसोबत बैठका घेतल्या आहेत. यामध्ये ‘आयएसओ’ मानांकनाचे महत्व पटवून देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानेनही युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. यामध्ये जिल्हा पुरवठा कार्यालयासह जिह्यातील 1640 रेशन दुकाने, 14 शासाकीय धान्य गोदामे, 12 तालुका पुरवठा कार्यालये, एक शहर पुरवठा कार्यालय या ठिकाणी स्वच्छतेसह रंगरंगोटीची तयारी सुरु करण्यात आली आहे. या सर्वांना एक महिन्याचे उद्दीष्ट देण्यात आले असून त्यांच्याकडून आढावा घेतला जात आहे.
रेशन दुकानांची स्वच्छता, रंगरंगोटी, दुकानातील धान्याची आवक आणि वितरण यांचे रजिस्टर, लाभार्थीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, दुकानासमोरील आवश्यक फलक, पात्र लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य वाटप, रेशन घेण्यासठी आलेल्या लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, आदी निकषावर या दुकानांचे आयएसओ मानांकन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व धान्य गोदामे, तालुका आणि जिल्हा पुरवठा कार्यालयातील कामकाज, स्वच्छता, ग्राहकांच्या तक्रारी अर्जांचा निपटारा निकषांवर आयएसओ मानांकन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील रेशन दुकाने, जिल्हा पुरवठा कार्यालय, शासकीय धान्य गोदामे, तालुका पुरवठा कार्यालये, शहर पुरवठा कार्यालये यांचे आयएसओ मानांकनसाठी मुल्यमापन होणार आहे. त्यादृष्टीने जिह्यातील रेशन दुकाने, जिल्हा पुरवठा कार्यालय, शासकीय धान्य गोदामे, तालुका पुरवठा कार्यालये, शहर पुरवठा कार्यालये आदी ठिकाणी तयारी सुरु आहे. एक महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.