म्युझिकल फाऊंटनचे होणार लवकरच लोकार्पण : काम पूर्ण : चाचणीही यशस्वी
प्रतिनिधी / मालवण:
सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या मालवणात दर वषी पर्यटकांचा ओघ वाढतच असतो. पर्यटकांना नवे काहीतरी देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या मालवण नगर पालिकेचा ’म्युझिकल फाऊंटन’ प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाची चाचणी यशस्वी ठरली आहे.
जिल्हा वार्षिक योजना पर्यटन निधीतून तब्बल एक कोटी खर्चाचा हा प्रकल्प मालवण रॉक गार्डन येथे उभारण्यात आला आहे. कलरफुल लाईट अन मुझिकच्या तालावर पाण्याचे कारंजे निश्चितच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. मालवण नगर पालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी यासाठी विशेष लक्ष दिले होते. मालवणच्या पर्यटनामध्ये हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रयत्नशिल होती.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकण पट्टय़ात सद्यस्थितीत हे एकमेव ‘म्युझिकल फाऊंटन’ आहे, असा दावा पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. मालवण रॉक गार्डन येथील या फाऊंटनची उभारणी नव्या पद्धतीने करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी रॉक गार्डन येथे कलरफुल एलईडी लाईट बसवण्यात आल्या. येथील संपूर्ण परिसर पर्यटकांना आकर्षित करीत आहे. खडकांवर आदळणाऱया लाटा, फेसाळणारा समुद्र हा नजारा पाहत येथे आलेला प्रत्येकजण स्थिरावतो. सूर्यास्ताचा नजाराही अनोखा असतो. गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी बसवण्यात आली आहेत. सर्वत्र बैठक व्यवस्थाही आहे. निळय़ाभोर आकाशाखाली हिरवळीवर बसण्याचा आनंद काही औरच आहे. रॉक गार्डनच्या या सौंदर्यात आता म्युझिकल फाऊंटनची भर पडली आहे.
साऊंड सिस्टिमवर लागलेली गाणी, त्या तालावर उडणारे पाण्याचे कारंजे, कलरफुल लाईट या स्वरुपात म्युझिकल फाऊंटनचा नजारा असणार आहे. लवकरच लोकार्पण होऊन हा प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.