क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
नारीशक्ती व सिग्नेचर स्पोट्स क्लब आयोजित नरेंद्र कुलकर्णी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धेत सिग्नेचार संघाने सीसीआय बी चा तर रॉजर संघाने गोकाक ग्लॅडिएटरचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरज तलवार (सिग्नेचर), विरेश गौडर (रॉजर) सामनावीर ठरले. जिमखाना मैदानावर पहिल्या उपांत्य सामन्यात सीसीआयबी संघाने 20 षटकात सर्वबाद 132 धावा केल्या. संकेत देसाईने 31, सत्यजित पाटीलने 28, संदीप मुरारीने 20 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे आनंद कुंभारने 14 धावात 3 तर अमोल यल्लुप्पाचे याने 19 धावात 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल सिग्नेचर संघाने 19.3 षटकात 7 बाद 133 धावांसह सामना 3 गडय़ांनी जिंकला सुरज तलवारने 1 षटकार 6 चौकारासह 55 तर विशाल बेडकाने 1 षटकार 3 चौकारासह 34 धावा केल्या. सीसीआय बी तर्फे केशर व गौरव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात गोकाक ग्लॅडिएटरने 19.5 षटकात सर्व गडी बाद 95 धावा केल्या. माजीद मकानदारने 24 तर आदित्य साखरदांडेने 21 धावा केल्या. रॉजरतर्फे विरेश गौडरने 8 धावात 3 तर पार्थ पाटीलने 16 धावात दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल रॉजर संघाने 15.2 षटकात 5 बाद 97 धावांसह सामना 5 गडय़ांनी जिंकला. विरेश गौडरने 2 षटकार 2 चौकारासह नाबाद 21 तर आकाश बंडरालेने 3 चौकारासह 20 धावा केल्या. गोकाकतर्फे माजीद मकानदार व नेहाल तेरणी यांनी प्रत्येकी 14 धावात 2 गडी बाद केले. शनिवारी अंतिम सामना सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब वि. रॉजर क्रिकेट क्लब यांच्यात सकाळी 10 वा. खेळविण्यात येणार
आहे.