ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविचसह बार्टी, केनिनही उपांत्य फेरीत, रेऑनिक, क्विटोव्हा, जेबॉ यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ मेलबर्न
स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने अमेरिकेच्या 100 व्या मानांकित टेनीस सँडग्रेनवर अतिशय चुरशीच्या लढतीत आश्चर्यकारकरीत्या मात करून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याने तब्बल सात मॅचपॉईंट्स वाचवत हा सामना जिंकल्यानंतर ‘माझा चमत्कारावर विश्वास आहे’ असे त्याने प्रतिपादन केले. याशिवाय नोव्हॅक जोकोविच, ऍश्ले बार्टी, केनिन यांनीही उपांत्य फेरी गाठली तर मिलोस रेऑनिक, पेत्र क्विटोव्हा यांचे आव्हान समाप्त झाले.
सहा वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या फेडरनने धोंडशिरेच्या वेदना व सँडग्रेनचा कडवा प्रतिकार यांच्याशी मुकाबला करीत 6-3, 2-6, 2-6, 7-6 (10-8), 6-3 अशी मात करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. त्याची उपांत्य लढत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचशी होणार आहे. तिसऱया सेटवेळी असभ्य भाषा वापरल्याबद्दल पंचांनी फेडररला ताकीद देण्याचा दुर्मीळ प्रकार पहावयास मिळाला. धोंडशिर दुखावल्याने तो उपचार करून घेण्यासाठी काही वेळ कोर्टबाहेर गेला होते. तरीही पाचव्या सेटवेळी या दुखापतीचा त्याला त्रास होत असल्याचे दिसून आले. ‘दुखापतीमुळे आपली संधी हुकलीय असेच मला वाटत होते. तो हा सामना जिंकणार अशी माझी धारणा होती. पण त्याला ते जमले नाही. खरोखरच मी आज खूप सुदैवी ठरलो,’ असे फेडररने चमत्कारावर माझा विश्वास आहे, असे म्हणताना सांगितले. ग्रँडस्लॅमची 46 व्या वेळी उपांत्य फेरी गाठण्यासाठी फेडररला बराच संघर्ष करावा लागला आहे. तिसऱया फेरीत जॉन मिलमनविरुद्ध पराभूत होण्यासाठी पाचव्या सेटमधील टायब्रेकरमध्ये तो केवळ दोन गुण मागे होता तर चौथ्या फेरीत 67 व्या मानांकित मार्टन फुक्सोविक्सविरुद्ध त्याने एक सेट गमविला होता. यावरही त्याने मात करून इथवर मजल मारली आहे.
रेऑनिक पराभूत
विद्यमान विजेत्या जोकोविचने कॅनडाच्या मिलोस रेऑनिकचा फडशा पाडत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. त्याने रेऑनिकवर 6-4, 6-3, 7-6 (7-1) अशी मात केली. हा सामना अटीतटीचा होईल, अशी अपेक्षा होती. पण शेवटचा सेट वगळता हा सामना एकतर्फीच झाला. या सेटवेळी कॉन्टॅक्ट लेन्सचा अडथळा झाला. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही आठवी वेळ आहे.
बार्टी, केनिन पहिल्यांदाच उपांत्य फेरीत
महिला एकेरीत जागतिक अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन झेकच्या सातव्या मानांकित पेत्र क्विटोव्हाचे आव्हान संपुष्टात आणत पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिने क्विटोव्हावर 7-6 (8-6), 6-2 असा पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत याच टप्प्यावर बार्टीला क्विटोव्हाने हरविले होते. त्याची परतफेड बार्टीने यावेळी केली. तिची लढत अमेरिकेच्या चौदाव्या मानांकित सोफियना केनिनशी होईल. 21 वर्षीय केनिनने टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉचा 6-4, 6-4 असा पराभव करीत तिची घोडदौड रोखली. ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. आधीच्या फेरीत तिने 15 वर्षीय कोको गॉफचीही घोडदौड रोखली होती. ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली अरब महिला होण्याचा मान जेबॉने मिळविला.
मेलबर्नमध्ये टॉपच्या खेळाडू लवकर स्पर्धेबाहेर पडण्याची परंपरा आहे. यावेळी सेरेना विल्यम्स, विद्यमान विजेती नाओमी ओसाका या तिसऱया फेरीतच बाद झाल्या. बुधवारी चौथी मानांकित सिमोना हॅलेपची 28 व्या मानांकित ऍनेट कोन्टावेटशी तर बिगरमानांकित गार्बिन मुगुरुझाची लढत 30 व्या मानांकित ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हाशी होणार आहे.
लियांडर पेस स्पर्धेबाहेर
भारताचा अनुभवी टेनिसपटू लियांडर पेसचे शेवटच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत एलेना ओस्टापेन्कोसमवेत खेळताना त्याला जेमी मरे-बेथनी मॅटेक सँड्स यांच्याकडून दुसऱया फेरीत पराभव स्वीकारावा लागला. पेस-ओस्टापेन्को यांना 2-6, 5-7 असे तासाभराच्या खेळात पराभूत व्हावे लागले. व्यावसायिक टेनिसमधील आपले हे शेवटचे वर्ष असल्याचे पेसने याआधीच जाहीर केले असल्याने तो पुढील वर्षी या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. आता रोहन बोपण्णा हा एकमेव भारतीय या स्पर्धेत राहिला असून युक्रेनच्या नादिया किचेनॉकसमवेत तो मिश्रमध्ये खेळत आहे. बुधवारी त्यांची उपांत्यपूर्व लढत पाचव्या मानांकित निकोला मेकटिच व बार्बरा क्रेसिकोव्हा यांच्याशी होणार आहे.