वृत्तसंस्था/चेन्नई :
माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंगला लॉकडाऊन नियमाचा भंग केल्याबद्दल गुरुवारी 500 रुपयांचा दंड करण्यात आला. तामिळनाडूच्या 56 वर्षीय रॉबिन सिंग भाजी खरेदीसाठी कारने बाहेर पडला होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. कोव्हिड-19 चे अस्मानी संकट नेस्तनाबूत करण्यासाठी चेन्नई व संलग्न तीन जिल्हय़ात दि. 19 ते 30 जून या कालावधीत कडक लॉकडाऊन लागू केले गेले आहे. या लॉकडाऊनच्या नियमानुसार, नागरिकांना त्यांच्या निवासस्थानापासून फक्त दोन किलोमीटर अंतरापर्यंतच ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय, वाहन वापरण्यास परवानगी नाही. रॉबिन सिंग कारने येत होता. त्यामुळे, पोलिसांनी त्याची कार जप्त केली व ती शास्त्रीनगर पोलीस ठाण्याकडे रवाना केली.
रॉबिन सिंगने भारतीय संघातर्फे 1 कसोटी व 136 वनडे सामने खेळले असून 1990 च्या दशकातील संघाचा तो अविभाज्य घटक राहिला. इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या 1999 आयसीसी विश्वचषक स्पर्धेतही त्याने संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. या दिग्गज खेळाडूने नंतर राष्ट्रीय संघाचा व आयपीएल प्रँचायझी मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.