कर्णधार विराट कोहलीची 53 चेंडूतील नाबाद 72 धावांची खेळी निर्णायक, फिरकीपटू यजुवेंद्र चहलचे 24 धावात 3 बळी
वृत्तसंस्था/ अबु धाबी
कर्णधार विराट कोहलीने अवघ्या 53 चेंडूत नाबाद 72 धावांची आतषबाजी केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून पराभवाचा जोरदार धक्का दिला. राजस्थान रॉयल्सने 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आरसीबीने 5 चेंडूंचा खेळ बाकी राखत 2 बाद 158 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला. या विजयासह आरसीबी संघ गुणतालिकेत काही कालावधीसाठी अव्वलस्थानी विराजमान होते. आरसीबीचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने 24 धावात 3 बळी घेतले.
विजयासाठी 155 धावांच्या पाठलाग करणाऱया आरसीबीला राजस्थानने फिंचचा बळी घेत प्रारंभीच मोठा धक्का दिला. पण, नंतर विराटने जोरदार फटकेबाजी केली आणि त्याच्यासह देवदत्त पडिक्कलच्या (63) आक्रमक फटकेबाजीमुळे राजस्थान जवळपास नेस्तनाबूत झाले. 20 वर्षीय देवदत्तने मागील तीन लढतीत अनुक्रमे 56, 1, 54 धावा जमवल्या होत्या. शनिवारी येथील लढतीत त्याने आपला फॉर्म कायम राखला.
पडिक्कल व कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी 99 धावांची भागीदारी साकारली. त्यानंतर पडिक्कल डावातील 16 व्या षटकात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. कोहलीने या लढतीच्या माध्यमातून हंगामातील पहिले अर्धशतक झळकावत अपयशाची कोंडी फोडली. पडिक्कल बाद झाल्यानंतर कोहलीच्या साथीला एबी डीव्हिलियर्स मैदानात उतरला आणि या जोडीने सहज विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
महिपाल लोमरोरची फटकेबाजी
तत्पूर्वी, मध्यफळीतील फलंदाज महिपाल लोमरोरने 47 धावांचे योगदान दिल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आरसीबीला 155 धावांचे आव्हान दिले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर राजस्थानची फारशी आश्वासक सुरुवात झाली नाही. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (5), जोस बटलर (22) व संजू सॅमसन (4) पहिल्या 5 षटकापूर्वीच बाद झाले होते. मात्र, हंगामातील पहिला सामना खेळणाऱया लोमरोरने 47 धावांचे योगदान देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
राहुल तेवातिया व जोफ्रा आर्चर यांनी शेवटच्या 20 चेंडूत 40 धावांची फटकेबाजी केली आणि यामुळे राजस्थानला 150 धावांचा टप्पा सर करता आला होता. तेवातिया 12 चेंडूत 24 तर आर्चर 10 चेंडूत 16 धावांवर नाबाद राहिले. बेंगळूरतर्फे चहलने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 24 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
धावफलक
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर झे. पडिक्कल, गो. सैनी 22 (12 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. उदाना 5 (5 चेंडूत 1 चौकार), संजू सॅमसन झे. व गो. चहल 4 (3 चेंडूत 1 चौकार), रॉबिन उत्थप्पा झे. उदाना, गो. चहल 17 (22 चेंडूत 1 चौकार), महिपाल लोमरोर झे. पडिक्कल, गो. चहल 47 (39 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), रियान पराग झे. फिंच, गो. उदाना 16 (18 चेंडूत 1 चौकार), राहुल तेवातिया नाबाद 24 (12 चेंडूत 3 षटकार), जोफ्रा आर्चर नाबाद 16 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 3. एकूण 20 षटकात 6 बाद 154.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-27 (स्टीव्हन स्मिथ, 2.4), 2-31 (बटलर, 3.1), 3-31 (संजू सॅमसन, 4.1), 4-70 (उत्थप्पा, 10.1), 5-105 (रियान पराग, 15.5), 6-114 (महिपाल, 16.4).
गोलंदाजी : उदाना 4-0-41-2, वॉशिंग्टन सुंदर 4-0-20-0, नवदीप सैनी 4-1-37-1, यजुवेंद्र चहल 4-0-24-3, ऍडम झाम्पा 3-0-27-0, शिवम दुबे 1-0-4-0.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : देवदत्त पडिक्कल त्रि. गो. आर्चर 63 (45 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), ऍरॉन फिंच पायचीत गो. गोपाल 8 (7 चेंडूत 2 चौकार), विराट कोहली नाबाद 72 (53 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), एबी डीव्हिलियर्स नाबाद 12 (10 चेंडूत 1 चौकार). अवांतर 3. एकूण 19.1 षटकात 2 बाद 158.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-25 (फिंच, 2.3), 2-124 (पडिक्कल, 15.5).
गोलंदाजी : आर्चर 4-0-18-1, जयदेव उनादकट 3-0-31-0, श्रेयस गोपाल 4-0-27-1, टॉम करण 3.1-0-40-0, तेवातिया 4-0-28-0, रियान पराग 1-0-13-0.