प्रतिनिधी / कणकवली:
आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व नोकरीची संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीचा सीटीस एज्युकॉन प्रा. लि. या सर्टीफिकेशन कोर्सेस देणाऱया कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सीटीस एज्युकॉन कंपनी विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्री ओरिएंटेड विविध सर्टिफिकेशन कोर्सेस घेते. ज्यांचा विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी फार उपयोग होतो. सदरची कंपनी ही नामांकीत असून ते घेत असलेल्या सर्टिफिकेशन कोर्सेसचे कार्पोरेट क्षेत्रात फार महत्व आहे. हे कोर्सेस केल्यावर विद्यार्थी स्वतंत्र उद्योग, व्यवसाय सुरू करू शकतात.
सदरच्या सीटीस एज्युकॉन कंपनीचे डॉ. हर्षद सांगळे व नीलेश दिघे यांनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नीतेश राणे भेट घेऊन अभियांत्रिकी महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत उपलब्ध कोर्सेसचा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसोबतच सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कला, वाणिज्य, विज्ञान व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. सीटीस एज्युकॉन प्रा. लि. च्या माध्यमातून जावा, पायथॉन यासारखे प्रोग्रॅमिंग कोर्सेस, मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन कोर्सस, ऍनिमेशन, ऑटोडेस्क इव्हेंटर, माया, फोटोशॉप, डिजिटल मार्केटिंग, कॉम्प्युटर नेटवर्किंग इत्यादीसारखे अनेक कोर्सेस नाममात्र शुल्कात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदरच्या करारासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल यांनी विशेष प्रयत्न केले. या सामंजस्य कराराबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे, उपाध्यक्ष नीलेश राणे, सचिव नीतेश राणे, प्राचार्य डॉ. अनिश गांगल, सर्व
विभागप्रमुख, महाविद्यालयाचा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांनी अभिनंदन केले आहे.