आयटी, हॉटेल उद्योग आघाडीवर – नोकरी जॉब स्पीकच्या अहवालात माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील रोजगार क्षेत्राला सध्या अच्छे दिन अनुभवायला मिळत आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये भारतातील रोजगाराची टक्केवारी 57 टक्के इतकी दमदार वाढली आहे. नोकरी जॉब स्पीक यांच्या ताज्या पाहणी अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
भारतीय बाजारात विविध कंपन्यांनी आपल्या व्यवसायाला जोर दिला असून विविध पातळीवर नव्या उमेदवारांना संधी उपलब्ध केली आहे. यातूनच नव्या उमेदवारांच्या भरतीमध्ये सप्टेंबरमध्ये चांगलीच वाढ दिसली आहे. सप्टेंबरमध्ये सलग तिसऱया महिन्यामध्ये रोजगारात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2019 च्या तुलनेमध्ये यावर्षी 21 टक्के अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत.
नोकरी जॉब स्पीक ही कंपनी दर महिन्याला आपल्या संकेतस्थळावर रोजगार भरती संबंधातील माहिती प्रकाशित करत असते. विविध उद्योग, शहरे आणि अनुभवाच्या स्तरावर भरतीची माहिती गोळा कंपनी करत असते. त्यांच्या माहितीनुसार आयटी क्षेत्राने आणि अतिथ्य सेवा क्षेत्राने नोकरीमध्ये सर्वाधिक संधी उपलब्ध केल्या आहेत. सॉफ्टवेअर व सॉफ्टवेअर सेवेशी सलग्न कंपन्यांनीही नोकर भरतीमध्ये 138 टक्के वाढ दर्शविली आहे.
हॉटेल उद्योगाने 82 टक्के इतकी वाढ भरतीत केली आहे. सप्टेंबरमध्ये देशभरामधील हॉटेल उद्योगांना सुरुवात झाल्याने त्याठिकाणी नव्याने भरतीचे प्रमाण वाढलेले दिसून आले. कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आल्याने हॉटेल व्यवसायांनी पुन्हा झेप घ्यायला सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून हॉटेल उद्योगामध्ये भरतीचे प्रमाण वाढताना दिसते आहे.