आपचा नावेली, केपे, पेडणेतील नागरिकांशी संवाद
प्रतिनिधी / पणजी
अन्य पक्षांचे नेते एकतर पक्षांतरे किंवा कॅडरचे व्यवस्थापन पाहण्यात व्यस्त आहेत, तेथे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या रोजगार हमीची माहिती तळागाळात पोहोचविण्याचे काम करत आहेत. त्यातून त्यांना नागरिकांच्या अनेक समस्यांची जाणीव, माहिती मिळत असून ती सोडविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सप्ताहाच्या प्रारंभी पक्षाच्या नेत्यांनी नावेली, केपे आणि पेडणेतील लोकांच्या समस्या ऐकून घेत आपचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविला आहे.
पेडणेतील टीमने धारगळमधील स्थानिकांची भेट घेतली. रोजगाराच्या क्षेत्रात गोवा मागे का आहे आणि गोव्यातील तरुणांना नोकऱया का मिळत नाहीत? याची माहिती घरोघरी जाऊन दिली. त्याचबरोबर ही समस्या सोडविण्यासाठी आपचे ऍक्शन प्लॅन काय असेल याचीही माहिती दिली. खाण व पर्यटन व्यवसाय कोलमडल्याने अनेकांनी नोकऱया गमावल्या. या पार्श्वभूमिवर प्रत्येक कुटुंबाला नोकरी मिळेपर्यंत दरमहा 5,000 रुपये भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
केपेतील मतदार बाबू कवळेकरांवर नाराज
केपेतील रहिवाशांनी आपचे सहसचिव राऊल परेरा यांची भेट घेतली. महामारी काळात सरकार जनतेसोबत राहण्यात अपयशी ठरल्याबद्दल खास करून महिलांनी संताप व्यक्त केला. स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यावर लोक प्रचंड नाराज असून ते वादग्रस्त बातम्यामध्ये चर्चेत असल्याने खंत व्यक्त करण्यात आली.
उपाध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो देखील नावेलीच्या रहिवाशांना घरोघरी जाऊन भेटत आहे. लुईझिन फालेरो यांनी वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमदारकीचा त्याग करून या मतदारसंघाला पोरके केले आहे. त्यामुळे नावेलीच्या रहिवाशांनी ऍड. कुतिन्हो यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. आपच्या बेकारी भत्ता आश्वासनामुळे तरुणांमध्ये उत्साह दिसून आला.
केपेच्या रहिवाशांनी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला असून दोन्ही पक्षांनी त्यांची निराशा केली आहे. गत निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला मतदान केले. परंतु बाबू कावळेकरांनी भाजपात उडी मारली. त्यामुळे आता आम आदमी हा एकमेव पर्याय असल्याचे आप गोवा सहसचिव राऊल परेरा म्हणाले.
दरम्यान, गोवेकरांनी खुल्या मनाने आमचे स्वागत केले आहे. गोवेकरांना खात्री आहे की, आप हा एकमेव पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीरपणे राहणार आहे, असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.