प्रतिदिन 309 रुपये मजुरी मिळणार : कामगारांना दिलासा, रोजगार हमीची कामे सुरळीत : चालू वर्षात अधिक दिवस काम
प्रतिनिधी /बेळगाव
अकुशल कामगारांचा आर्थिक स्तर उंचावणाऱया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (नरेगा) लाभार्थ्यांच्या मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे मजुरांना प्रतिदिन 309 रुपये मजुरी मिळणार आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात तलाव, गटारी, कालवे, शाळा दुरुस्ती यासह इतर कामे सुरू आहेत. पूर्वी मजुरांना प्रतिदिन 289 रुपये मजुरी दिली जात होती. त्यात आता 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कामगारांना आता प्रतिदिन 309 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे कोरोना आणि महागाईमुळे अडचणीत सापडलेल्या रोजगार हमी मजुरांना दिलासा मिळाला आहे. रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांच्या मजुरीत 2019 पासून वाढ होत आहे. 2019 मध्ये 249 रु., 2020 मध्ये 275 रु., 2021 मध्ये 289 रु., तर 2022 मध्ये 309 रुपये अशी मजुरीत वाढ झाली आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध करून देणारी ही महत्त्वाची योजना आहे. मात्र, मागील दोन वर्षात कोरोना आणि महापुरामुळे रोजगार हमीच्या कामात विस्कळीतपणा आला होता. दरम्यान, कामगारांना अतिरिक्त 50 दिवस काम वाढवून देण्यात आले होते.
यंदा कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर रोजगार हमीची कामे सुरळीत सुरू झाली आहेत. शिवाय आता कामगारांच्या मजुरीतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत मजुरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. चालू वर्षात या योजनेतून कामगारांना अधिक दिवस काम उपलब्ध झाले आहे. शिवाय केंद्र सरकारने 14 कोटी मानवदिन काम देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारसमोर ठेवले आहे.
एप्रिलपासून मजुरीत वाढ
रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांच्या मजुरीत वाढ करण्यात आली आहे. मात्र, अद्याप आपल्याकडे रितसर आदेश आला नाही. मात्र, 1 एप्रिलपासून मजुरीतील नवी वाढ लागू करण्यात आली आहे.
– बसवराज एन. (साहाय्यक जिल्हा कार्यक्रम संयोजक)
तालुके | एकूण जॉबकार्ड | पात्र कुटुंबीय | मानवदिवस काम |
अथणी | 70613 | 29546 | 1398969 |
बेळगाव | 91428 | 35921 | 1711509 |
बैलहोंगल | 47600 | 19726 | 888146 |
चिकोडी | 55140 | 20735 | 1161124 |
गोकाक | 51616 | 21296 | 1005164 |
हुक्केरी | 81947 | 43114 | 2479184 |
कागवाड | 15218 | 3372 | 142347 |
खानापूर | 57620 | 26508 | 1096250 |
कित्तूर | 21041 | 11090 | 465979 |
मुडलगी | 29075 | 11965 | 617952 |
निपाणी | 37257 | 11877 | 532047 |
रामदुर्ग | 42255 | 19238 | 1215553 |
रायबाग | 68384 | 21438 | 1248254 |
सौंदत्ती | 67402 | 27094 | 1280964 |
एकूण | 736596 | 322920 | 15243442 |