आरएसए गोवा संघाकडे रोज चषक
प्रतिनिधी /क्रीडा
गोव्यातील वास्को येथे रोज स्पोर्ट्स अकादमी आयोजित 11 वर्षाखालील बाद पद्धतीच्या बेबी फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमी संघाचा आरएसए गोवा संघाने टायब्रेकरमध्ये 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत मानस अकादमी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मानस अकादमी संघाने दीपक स्पोर्ट्स क्लब वास्को संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. मानस संघातर्फे हुसेन जमादारने हॅट्ट्रिकसह 3, रोशन अब्बास व झेन मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गोल केला. उपांत्य फेरीत मानस स्पोर्ट्स संघाने टीसीएच गोवा संघाचा चुरशीच्या लढतीत 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात बेळगावतर्फे रोशन अब्बास व आदित्य नाकाडी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर गोवातर्फे जॉन परेराने गोल केला.
अंतिम लढतीत निर्धारित वेळेत 17 व्या मिनिटाला आरएसए गोवा संघाच्या झेवियर गोम्सने गोल करून आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 28 व्या मिनिटाला मानस स्पोर्ट्सच्या आदित्य नाकाडीने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. निर्धारित वेळेत बरोबरी झाल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये आरएसए गोवा संघाने 2-1 असा विजय मिळविला. आरएसए संघातर्फे झेवियर गोम्स व ऍन्थोनी यांनी गोल केले तर बेळगावतर्फे आदित्य नाकाडीने गोल केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रोज फुटबॉल अकादमीचे संचालक जॉक कुलासो, फादर फ्रँकी, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू वसंत पेडणेकर, माजी भारतीय ज्युनियर संघाचे प्रशिक्षक ज्युड बॅरेटो, चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक डॉ. ल्योना आणि डॉ. ग्रेसी मोराईस यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मानस अकादमी संघात आदित्य नाकाडी, झेन मुल्ला, हुसेन जमादार, श्रावणी बारदस्त, रोशन मुटगीगार, रोशन अब्बास, आर्यन. कंग्राळकर आदी खेळाडूंचा समावेश होता.