बॉम्बे रेस्टारंटमधील मार्ग फक्त अत्यावश्यक सेवेसाठी खुला
प्रतिनिधी/ सातारा
बॉम्बे रेस्टॉरंट येथून पोवईनाका असा येणाऱया मार्गाला दररोज नवनवीन नियम लागू करण्यात येत आहेत. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करायला भाग पाडले जात आहे. आता हा मार्ग अत्यावश्यक सेवेसाठी खुला ठेवण्यात आल्याने वाहनचालकांना वाढेफाटा मार्गे प्रवास करण्याची वेळ आली आहे.
ं जिह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर शहरातील सीमा सील करण्यात आल्या आहेत. शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट आणि वाढे फाटा, बोगदा, यवतेश्वर मार्ग, मोळाचा ओढा या ठिकाणी बॅरिकेट्स लावून सीमा सील करण्यात आल्या आहेत. पोवईनाका, राजवाडय़ाकडे जाण्यासाठी बॉम्बे रेस्टॉरंट येथून मार्ग अत्यंत जवळचा व सुकर समजला जातो. संचारबंदीच्या काळात हा मार्ग पोवईनाका, राजवाडा येथे जाण्यासाठी खुला होता. शनिवारी सायंकाळ नंतर मात्र हा रस्ता फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी खुला ठेवण्यात आला असून अन्य वाहन चालकांना पोवईनाका अथवा राजवाडय़ाकडे जायचे असेल तर त्यांना आता वाढे फाटय़ा मार्गे जाण्याच्या सूचना करण्यात येत असल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे दररोज तारेवरची कसरत सुरू असून एकाच निर्णयावर ठाम राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.