तुळजापूर :- प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. यामुळे यापुढे सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी केल्यास १ हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे. तर कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आता दररोज फक्त ५ हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
तर, श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासह इतर जिल्ह्यांतील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे ही दर रविवारी बंद राहणार असून भाविकांना दर्शनासाठी सकाळी ७ ते सांयकाळी ७ पर्यंत म्हणजे १२ तासासाठी धार्मिक स्थळे सुरु राहतील. केवळ ५ जणांना धार्मिक विधीसाठी उपस्थित राहता येणार आहे तर भाविकांनी शक्यतो ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी श्रीदेवींच्या सर्व भक्त भाविकांना केले आहे.