प्रतिनिधी / खेड
महाराष्ट्र राज्य योगा असोसिएशनतर्फे योगा फेडरेशन ऑफ इंडिया, एशियन योगा फेडरेशन व इंटरनॅशनल योगा स्पोर्टस फेडरेशन यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमधील अनुष्का म्हातले व अक्षता कदम यांनी यश प्राप्त केले. अनुष्काची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. इयत्ता ६वी शिकणाऱ्या अनुष्काने १२ वर्षाखालील मुलींच्या गटात तृतीय तर इयत्ता ११ वीतील अक्षताने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात चतुर्थ क्रमांक मिळवला. या दोघींनी यापूर्वीही तालुका, जिल्हा, विभाग व राज्य व राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेस पदके प्राप्त केली आहेत. अनुष्काने राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उत्तम खेळी करुन जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
दोघींना योगा प्रशिक्षक गौरव आंब्रे, श्रेयस पाटणे व क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे यांच्याहस्ते दोघींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गव्हनिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अजित भोसले, संस्था पदाधिकारी पराग चिखले, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.