प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन संघटनेच्या 47 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून कोविड योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटे. उद्योजक अजय हेडा, साहाय्यक गव्हर्नर रोटे. डॉ. मनोज सुतार, संघटनेचे अध्यक्ष रोटे. अशोक कोळी, सचिव रोटे. नागेश मोरे, इव्हेंट चेअरमन सतीश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या 2 वर्षात संपूर्ण देशात कोविडने थैमान माजले आहे. या काळात बेळगाव व इतर परिसरातील शूर योद्धय़ांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पीडित कोरोनाग्रस्तांची मदत केली. त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. अश्रुत शंकर पाटील, पप्पू शिंदे, महेश जाधव, विनायक पाटील, सचिन पाटील, भारत नागरोळी, अभिषेक पुजारी, राजेंद्र बैलूर, संदीप कामुले, निलेश पाटील, नरेश निलजकर, विजय गोजेकर या योद्धय़ांचा खास सत्कार करण्यात आला. कोविडच्या काळात चार ऍम्ब्युलन्स घेऊन कोविड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे व इतर सोयी सवलती दिल्या. कोविडमध्ये मयत झालेल्या जवळपास 750 मयतांवर अंत्यविधी केले. दिवस-रात्र ऍब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिली.
त्याचप्रमाणे विजय फौंडेशनच्या प्रतिभा भातकांडे यांनी 350 हून अधिक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे जेवण दिले. 26 दिवस विनामोबदला त्यांनी जेवणाचे वाटप केले. निर्मल फौंडेशनच्या भास्कर पाटील यांनी 40 दिवस 400 हून अधिक गरजू नागरिकांना जेवणाचे वाटप केले. पाटील मळा बेळगाव येथील बाळकृष्ण तोपिनकट्टी, विक्रम बोंगाळे, सदानंद हावळ यांनीही लॉकडाऊनच्या काळात लोकांना जेवणाचे वाटप केले. या सर्वांचा सत्कार करण्यात आला.