प्रतिनिधी /धारबांदोडा
रोटरी क्लब फोंडा हिल टाऊन, इनर व्हिल क्लब फोंडा व रोटारेक्ट क्लब फोंडा हिल टाऊनच्यावतीने सावर्डे मतदारसंघातील पूरग्रस्तांना दोन चटई व दोन चादरी वितरीत करण्यात आल्या. धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील दावकोण या भागात 150 पूरग्रस्तांना तर कुळे शिगांव पंचायत क्षेत्रातील कुळे, माटोजे व तुरीमरडवाडा येथे सुमारे 200 पूरग्रस्तांना ही मदत करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब फोंडा हिल टाऊनचे अध्यक्ष सतीश नायर, रोटरीयन प्रभाकर इलूरकर, रोटरियन सिताराम सिंगबाळ, शौनक तेंडुलकर, धारबांदोडा पंचायतीचे पंचसदस्य विनायक गांवस, यशवंत बांदोडकर, परेश खुटकर, कुळे पंचायतीचे माजी सरपंच नरेश शिगांवकर, अशोक सावंत उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या दुःखात रोटरी क्लब फोंडा टाऊनचे सर्व सदस्य सहभागी आहेत. पुरामुळे जे नुकसान झाले आहे ते क्लब भरून काढू शकत नाही. मात्र क्लबकडून जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न क्लब करीत आहे, असे सिताराम सिंगबाळ यांनी सांगितले. धारबांदोडा पंचायतीचे पंचसदस्य विनायक गांवस यांच्याशी चर्चा करून पूरग्रस्तांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. विनायक गांवस यांनी क्लब जी मदत देईल त्यात आपलाही वाटा असेल. मात्र पूरग्रस्तांना मदत झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याप्रमाणे रोटरी क्लब व धारबांदोडा पंचायत मिळून लहानसे साहाय्य पूरग्रस्तांना करीत असल्याचे ते म्हणाले. आणखी कसलीही मदत हवी असल्यास या भागातील लोकांनी क्लबकडे संपर्क साधावा. जे शक्य आहे ते निश्चितच दिले जाईल असे ते शेवटी म्हणाले. दावकोण येथील पूरग्रस्तांची परिस्थिती पाहिल्यानंतर आपण रोटरी क्लबचे सदस्य सिताराम सिंगबाळ यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केल्यानंतर क्लबने दुसऱयाच दिवशी दावकोण येथे भेट देऊन चटई व चादरी पूरग्रस्तांना दिल्या. शिवाय आणखी काही मदत हवी असल्यास सांगण्यात आले तेव्हा आपण त्यांना कुळे भागातील व इतर भागातही मदत करण्याची विनंती केल्यानंतर क्लबने ते मान्य केले. याबद्दल आपण रोटरी क्लबचा ऋणी आहे असे विनायक गांवस म्हणाले. रुपेश वेळीप यांनी सूत्रसंचालन केले.