उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्गार,
प्रतिनिधी/ खेड
सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे रोटरी स्कूल कोकणात असल्याचा सार्थ अभिमान असून प्रशालेतील विद्यार्थ्यांची विद्वत्ता वाखाणण्याजोगीच आहे, असे गौरवोद्गार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काढले. दापोली विधानसभा मतदार संघात ‘शैक्षणिक हब’ निर्माण करून शैक्षणिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाहीही दिली.
रोटरी प्रतिष्ठान संचलित विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागाच्या कै. श्रीमती रजनी रामचंद्र पाटणे स्कूल, माध्यमिक विभागाच्या कै. महेश गोपीनाथ संसारे स्कूल, प्राथमिक विभागाच्या कै. डॉ. मधुकर महादेव साडविलकर व पूर्व प्राथमिक विभागाच्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई केरोपंत बेंडखळे स्कूलचे नामकरण व जेईई ऍडव्हान्स, नीट, जेईई बी. आर्च, सीए फाऊंडेशन, सीएस फाऊंडेशन, एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, रोटरी स्कूलने अल्पावधीतच गरूडझेप घेत प्रशालेतील विद्यार्थी विद्वत्तेचा दर्जाच सिद्ध करत असून ही भूषणावह बाब आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून विद्यार्थ्यांच्या विद्वत्तेपुढे काय बोलावे ते थोडेच असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला कौतुकाचे शब्दच कमी पडतील. विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घ्यायला हवी. शेतकऱयांची मुले चांगल्या पदावर घेवून जाणे हे ध्येय उराशी बाळगत रोटरी स्कूलची सुरू असलेली घोडदौड आदर्शवतच असल्याचे गौरवोद्गारही काढले.
आमदार योगेश कदम यांनीही मनोगतात विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षणासाठी न जाता विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण येथेच मिळावे, या भावनेतून ज्ञानगंगोत्रीच निर्माण करणाऱया रोटरी स्कूलच्या पदाधिकाऱयांचे श्रम निश्चितच कौतुकास पात्र आहे. चांगले गुण मिळवून आपले ध्येय पूर्ण केले असले तरी विद्यार्थ्यांनी आपली शाळा व जिल्हय़ाला विसरू नये, असा सल्लाही आमदार कदम यांनी दिला. रोटरी प्रतिष्ठानचे चेअरमन बिपीन पाटणे यांनी प्रास्ताविक केले.
रोटरी स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात सुरूवातीपासून आजपर्यंत केलेली वाटचाल व प्रगतीचा उंचावलेला आलेख दर्शवणारी व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. प्रशालेतील अंकिता कदम व अक्षता कदम या योगपट्टूंनी योग प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मोहम्मद कादिरी, श्रावणी पार्ठे, सार्थक बावधनकर या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
वाणिज्य शाखेतील शुभम भोसले, आदित्य गाडगीळ, विश्वा चुरी, मुग्धा मेहता, इक्रा परकार, जेईई आर्च परीक्षेतील समृद्धी कांबळे, अथर्व चव्हाण, श्रेया शिंदे, अमुल्या कोटेरा, एमएचटी-सीईटी परीक्षेतील पीसीएम ग्रुपमधील आकाश भंडारी, सानिया शेट, आर्यन चोगले, दक्ष खेडेकर, हर्ष बेंडखळे, पीसीबी ग्रुपमधील प्रतिक्षा येरूणकर, श्रेया बागडे, आदिती पारखी, ऋतुजा पवार, निधी बुटाला, मधुरा बोंडळे, इक्रा परकार, अथर्व पाटील, अर्निशा मोरे, सिमरन चव्हाण, नेहा मेहता, स्नेहल छपरे यांचा सत्कार करण्यात आला.
नीट परीक्षेत कोकणात अव्वलस्थान पटकावणाऱया अद्वैत भोसलेसह श्रावणी पार्ठे, यश गांगल, अय्युब चौगुले, अमेय मोरे, सानिया मेमन, धनश्री गवाणकर, मुक्ताई धामणकर, पूजा रजपूत, प्रेरणा गुजर, आदित्य पोंक्षे, श्रद्धा खेडेकर, श्रृती यादव, सोनाली घैसास, जेईई ऍडव्हान्स परीक्षेतील मोहम्मद कादिरी, रविराज शेलार, अरूण सुरेश, सुयश कर्नाड, वेदांत जाधव, निर्भय तांबे, फुरकान खतीब, मनस्वी कांबळे, सोहम कांबळी, तेजस बेलोसकर या सर्व गुणवंतांचा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व आमदार योगेश कदम यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन पाटणे, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, उपाध्यक्ष जोगेश साडविलकर, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, नेरोलॅक कंपनीचे व्यवस्थापक रमाकांत रूगे, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन करवा, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उमेश संसारे, मंदार संसारे, विश्वास पाटणे, संतोष पाटणे, संतोष पाटणे, संतोष गिल्डा, निरंजन दळी, शेखर तलाठी, अभय तलाठी, लक्ष्मीकांत पटेल, संदिप नायकवडी, आदित्य गांधी, अमित लढ्ढा, निकेतन पाटणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्पेश सकपाळ, योगेश वीर, बाळासाहेब राऊत यांनी केले.